सततच्या पावसाने ओढे, नाले बंधारे तुडूंब

 स्थैर्य, वावरहिरे, दि. २३ (अनिल अवघडे) : कायम दुष्काळी परिस्थितीशी सामना कराव्या लागणार्‍या माण तालुक्यात माञ यंदा  वरुणराजाने  सर्वञ जोरदार हजेरी लावल्याचे चिञ पाहायला मिळत आहे. तालुक्यातील वावरहिरे, दानवलेवाडी, डंगिरेवाडी, थदाळे, सोकासन परिसरात गेल्या दहा ते बारा दिवसापासुन सतत  हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. यामुळे डोगररांगानी हिरवा शालु पांघरल्याचे चिञ सर्वञ पाहायला मिळत आहे.


यावर्षी जनावरांना मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध झाला आहे. सतत रिपरिप सुरु असल्याने पावसाने दानादान उडाली आहे. या भागात मागील एक दोन वर्षात मोठ्या प्रमाणात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे येथील परिस्थिती हळुहळु बदलु पाहत आहे. सततच्या पावसामुळे  परिसरातील छोटेमोठे तलाव, बंधारे, ओढे, नाले, विहिरी तुडुंब भरुन ओसांडुन वाहु लागलेत. परंतु या सततच्या पावसाचा खरिप पिकाला मोठा फटका बसु लागला आहे. वातावरण पुर्णता बदलले आहे.

 दरम्यान दहा ते बारा  दिवसापासुन या परिसरात पावसाची झड लागल्याने नागरिक, शेतकरी, मजुंर हतबल झाले आहेत. थंडगार वातावरण निर्माण झाल्याने साथीचे आजार पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. सर्दि, थंडीताप, खोकला यासारख्या  आजाराने डोके वर काढले असुन रोजच्या या दमट वातावरणामुळे खाजगी दवाखान्यात रुग्णाची वाढ होताना दिसत आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला असुन बाजरी, मुग पिकांच्या शेतात पाणी साचुन राहत असल्याने पिके पिवळी पडुन सुकुन जावु लागलेत. त्यामुळे शासनाने शेतातील पिकांची पाहणी करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडुन होत आहे.


Previous Post Next Post