पुणे- बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचे ग्रहण कायम
स्थैर्य, सातारा, दि. २६ : प्रवास सुखाचा व्हावा आणि वेळेत पोहोच व्हावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग झाला. पुणे- बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरून वाहन नेताना अक्षरशः गावची पांद बरी असेच चित्र आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सातारा, कराड आणि जिल्ह्यातील व्हील अलायमेंटवाल्यांचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. तर महामार्गाकडेला असलेल्या पंचरवाल्यांच्या टपरी बाहेर टायरची मोठी थप्पी लागली आहे. दुचाकी वाहनधारकांकडून शॉक ऑबसर आणि सायलेंन्सरला मागणी वाढू लागली आहे. जिल्ह्यात महामार्गावर पडलेले खड्डे भरून घेण्यासाठी व रस्ता चांगला करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रस्ते प्राधिकरणच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.


पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे. वेळेत आणि सुरक्षित वाहतूक करता येत नाही.खड्डेच खड्डे झाल्याने अपघात व वाहनाचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर पडलेला प्रत्येक खड्डा हा वाहनाचे चाक वाकवून त्यास बेंड आणतो आहे. कित्येक चार चाकी वाहनांच्या रीमा वाकल्याच्या घटना घडल्या आहेत. काहींना चाके मिळाली नाहीत. याच खड्ड्यामुळे व्हील अलायमेंट करणार्‍या सातारा, कराड आणि शिरवळ येथील व्यावसायिकांना चांगले दिवस आले आहेत. लॉकडाउनमध्ये एवढाच व्यवसाय महामार्गाच्या खड्ड्यांमुळे जोमात आहे तसेच टायर पंक्चर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने महामार्गालगत असलेल्या टपर्‍यांबाहेर बाद टायरची थप्पी लागल्याचे आणि पंक्चर काढण्यासाठी रांगा दिसत आहेत.  दुचाकी वाहनांचे शॉकऑबसर आणि सायलेन्सर बाद होत असून त्याची मागणी वाढली आहे. मोठ्या वाहनांचेही टायर आणि पाटे खराब होत आहेत. एकंदरच वाहनांच्या खराबीमध्ये वाढ झाली आहे. रस्ते प्राधिकरणाच्या विरोधात सातारा जिल्ह्यातून सामाजिक संघटना एकत्र होत आहेत तसेच आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.