लोकाभिमुख कामे करण्यावर भर द्यावा : जिल्हाधिकारी शंभरकर
स्थैर्य, सोलापूर,दि.1: महसूल अधिकारी प्रशासनाचा कणा असून शासन आणि जनता यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. महसूल विभाग शेती आणि शेतीशी संबंधित घटकांसोबत इतर महत्वाची कामे करीत असतो. यामुळे शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण वेळेत होऊन लोकाभिमुख कामे करण्यावर या विभागाने भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर, प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी अंकित, सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवरत्न शेटे, उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले, चिटणीस श्रीकांत पाटील, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार, महसूल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंतनू गायकवाड, जिल्हाध्यक्ष जयंत जुगदार, महसूल कर्मचारी संघटनेचे विभागीय सरचिटणीस प्रवीण शिरसीकर, तलाठी संघटनेचे सरचिटणीस विजय विजापुरे, महसूल चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत भांडेकर, कोतवाल संघटनेचे विठ्ठल गुरव, पोलीस संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील आदी उपस्थित होते.

शंभरकर म्हणाले, ‘सध्या जिल्ह्यात कोविड-19 चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जागृत राहून कोरोनाबाबत प्रबोधन करून गैरसमज दूर करावा. महसूल विभागातर्फे कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी जागा देण्यास प्राधान्य राहील’.

महाभूमी पोर्टलवर संगणकीकृत अभिलेखापैकी फक्त सातबारा उतारा डिजीटल स्वाक्षरीने जनतेला डाऊनलोडसाठी उपलब्ध होता. आता डिजीटल स्वाक्षरीत खाते उताराही मिळणार आहे. कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, पीक कर्ज किंवा जमीन खरेदी विक्रीसाठी सातबारा उताऱ्यासोबत खाते उतारा आवश्यक आहे. यामुळे महसूल विभागाने खाते उतारासुद्धा तलाठी यांच्या डिजीटल स्वाक्षरीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, आजपासून ही सेवा उपलब्ध असणार आहे, याचा जनतेने लाभ घेण्याचे आवाहन शंभरकर यांनी केले.

प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी केले. सूत्रसंचालन निवृत्त तहसीलदार नागनाथ माळवदकर यांनी केले तर आभार संदीप लटके यांनी मानले.
Previous Post Next Post