खंडणीसाठी टोळक्याचा हॉटेल ग्रीनफिल्डवर हल्ला


 


स्थैर्य, सातारा, दि. 25 : खाद्यपदार्थांचे बिल मागितल्याने तसेच 1 लाख रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्याने सुमारे 10 ते 12 जणांच्या टोळक्याने सदरबझार येथील हॉटेल ग्रीनफिल्डवर दगडफेक करत हल्ला केला. यावेळी एकाला गजाने मारहाण केल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत हॉटेलचालक वैभव सुरेश लवळे, रा. सातारा यांनी मंगळवारी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तक्रार दाखल करून घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.


याबाबत फिर्यादी वैभव सुरेश लवळे यांनी दिलेली माहिती अशी,  सोमवार, दि.24 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आशुतोष देशमुख, रा. वेचले, ता. सातारा हा चौघांसमवेत हॉटेल ग्रीन फिल्डमध्ये दाखल झाला. आम्हाला आत बसू द्या अशी अरेरावीची भाषा करून ते हॉटेलमध्ये बसले. त्यांनी खाद्यपदार्थांची ऑर्डरही केली. खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर  जाताना त्यांच्याकडे 300 रुपये बिलाची मागणी केली असता बिल देणार नाही असे म्हणत ते मॅनेजरशी वाद घालू लागले. तो वाद मिटवल्यानंतर ते चौघे हॉटेल बाहेर पडले.


सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये पुन्हा चार मुले आली. त्यांनी वैभव लवळे आणि भारत शिंदे यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. यावेळी आशुतोष देशमुखने 1 लाख रुपये दे, नाही तर हॉटेल कसे चालते ते पाहतोच. मी मोठा दादा आहे. तुम्ही मला बाहेर भेटा, तुम्हाला सांगतोच अशी धमकी दिली. रात्री 9.10 वाजण्याच्या दरम्यान पुन्हा दहा ते पंधरा युवक हॉटेलच्या गेटवरून चढून आत आले. त्यांनी सोबत लोखंडी गज व लाकडी दांडकी आणली होती. पुन्हा वादावादी करत आशुतोष देशमुख याने भारत शिंदे याच्या डोक्यात गजाने वार केल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर वैभव लवळे आणि भारत शिंदे यांना हॉटेलच्या बाहेर खेचण्याचा युवकांनी प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत वैभव लवळे यांचा शर्ट फाटला. फाटलेल्या शर्टच्या खिशातून युवकांनी 4 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या घटनेनंतर संबंधित युवक तेथून पळून गेले. दरम्यान, या घटनेची फिर्याद दाखल करण्यासाठी वैभव सुरेश लवळे हे सकाळी 11 वाजल्यापासून सातारा शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या मारून बसले होते.  रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करून घेण्याचे काम सुरू होते.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya