सातारा जिल्हा बँकेची गरुड भरारी - जिल्हा बँकेत यु.पी.आय. सेवेचा शुभारंभ

 


स्थैर्य, सातारा, दि. २४ : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी सह. बँक ३२० शाखा व ४८ एटीएम च्या माध्यमातून ग्राहकांना अविरत अत्याधुनिक सेवा देत असून कृषी सहकारी क्षेत्रात निरंतर कार्य करीत आहे. ग्रामीण विकासाबरोबरच कृषी औद्योगिकरणाचे धोरण बँकेने गतिमान करण्यासाठी विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत.


बँक ग्राहकांच्या सोयीकरिता एटीएम,पॉज,मोबाईल बँकिंग,बीबीपीएस,आरटीजीएस, एनईएफटी इ. सुविधा देत आहे. सहकार क्षेत्रातील अग्रणी असणाऱ्या  सातारा जिल्हा मध्य.सह.बँकेस भारतीय राष्ट्रीय पेमेंट निगम (एनपीसीआय) ने युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) प्रणालीचा  वापर करणेस अनुमती दिली आहे.


या कार्यक्रमाचे उद्घाटन एन.पी.सी.आय चे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी अनुप नायर यांचे हस्ते झाले. याप्रसंगी बँकेचे जेष्ठ संचालक, मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, बँकेचे अध्यक्ष, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनिल माने, संचालक प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजपुरे, राजेश पाटील, अनिल देसाई,  प्रकाश बडेकर, प्रदीप विधाते, अर्जुनराव खाडे, वसंतराव मानकुमरे संचालिका कांचन साळुंखे तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे तसेच विविध विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी, तसेच बँकेचे ग्राहक, हितचिंतक ठेवीदार, कर्जदार, उपस्थित होते.


यावेळी ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, एनपीसीआय ने बँकेस मान्यता देऊन बँकेच्या कार्यपद्धतीवर पसंतीची मोहोर उमटवली आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) प्रणालीचा वापर करून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ग्राहकांसाठी डिजिटल पेमेंटचा सर्वोत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सातारा जिल्हा बँकेचा सहकारी बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्रातच नव्हेतर देशातही नावलौकिक असून जिल्हयामध्ये ग्रामीण व कृषी क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत आहे. जागतिकीकरण व आधुनिकीकरणामुळे राष्ट्रीयकृत व खाजगी बँकाप्रमाणेच सातारा जिल्हा बँक ग्राहकांना तत्पर व गुणात्मक सेवा देणेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील शेतकरी व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.


बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, बँकेने ग्राहकांना २०१३  मध्ये डिजिटल बँकिंग सेवा देणेस सुरुवात केलेली असून यामध्ये काळानुरुप झालेले बदलानुसार ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सर्व सेवा देणेचा प्रयत्न केला आहे. सातारा जिल्हा बँक देशातील नावलौकिक प्राप्त बँक असून बँक ग्राहकांना नेहमीच गुणात्मक व तप्तर सेवा देणेमध्ये अग्रेसर आहे . बँक युपीआय सव्र्हरला लिंक झालेमुळे ग्राहकांना गुगलपे, फोनपे, पेटीएम, फ्री चार्ज, जिओ मनी द्वारे फोन बिल भरणे, लाईट बिल भरणे, मोबाईल रिचार्ज करणे, ई-कॉमर्स इत्यादि सेवा उपलब्ध झालेल्या आहेत. सातारा जिल्हा बँकेने शेतकरी सभासद व ग्राहकांसाठी विविध योजना कार्यान्वित केलेल्या असून ग्राहक व शेतकरी सभासदांना त्याचा चांगला लाभ होत आहे . ठेवींदारांचा विश्वास संपादन केला आहे. राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकांचे बरोबरीने बँकेने ग्राहकांना सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.


मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले, सातारा जिल्हा बँक युपीआय सव्र्हरला लिंक झालेमुळे बॅंकेच्या ग्राहकाला कोणतेही डिजीटल व्यवहार घरबसल्या करता येणार आहेत . बँक ही आयएसओ सर्टीफाईड बँक असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये टाँप कोऑपरेटिव्ह बँक म्हणून नोंद झालेली नामांकित बँक आहे . बँकेने ग्राहकांना मोबाईल बँकिंग अॅप, एटीएम, मायक्रो एटीएम, मोबाईल एटीएम व्हॅन, चेक ट्रंकेशन  सिस्टीम इत्यादि सेवा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. सद्यःस्थितीत बँकेचे डिजिटल व्यवहार फक्त रुपे कार्डवरुन होत आहेत. बँकेचे ग्राहकांना युपीआय सव्र्हरमुळे सर्व प्रकारचे डिजीटल व्यवहार करता येणार आहेत. ग्राहकांना फोन बिल भरणे, लाईट बिल भरणे, ई-कॉमर्स इत्यादि सर्व व्यवहार घरबसल्या काही क्षणात करता येणार आहेत. गुगल पे, फोनपे, पेटीएम, अॅमेझोन  या प्रकारचे अॅप्लीकेशनद्वारे मोठया प्रमाणात जलद डिजीटल व्यवहार करता येतील.


अनुप नायर म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाराष्ट्रातील नावलौकिक प्राप्त  बँक असून ग्राहकांना डिजिटल सेवा देणेमध्ये अग्रेसर आहे. ग्राहकांना आधुनिक बँकिंगचे सेवा उपलब्ध होणेसाठी व स्पर्धात्मक युगामध्ये मागे न राहता राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांच्या बरोबरीने बँकेने डिजिटल सेवा ग्राहकांना उपलब्ध करुन दिलेली आहे ही अत्यंत चांगली बाब आहे. डिजीटल बँकिंग व्यवहारासाठी राज्यातील सहकारी बँकांना सातारा जिल्हा सहकारी बँकेने सुविधा उपलब्ध करून देऊन या बँकांना दिशा देण्याचे काम करावे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा महाराष्ट्रातील इतर सहकारी बँकांनी आदर्श घ्यावा असे या बँकेचे कामकाज असलेचे नमूद केले.


बँकेच्या ग्राहकांनी नजिकच्या शाखेत संपर्क साधून बँकेच्या रूपे डेबिट कार्ड, किसान क्रेडीट कार्ड, किसान एम –पे अप (मोबाईल बँकिंग), ऑनलाईन बँकिंग, भारत बिल पेमेंट सिस्टीम, आरटीजीएस/एनईएफटी इत्यादी सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.