गृहमंत्री अमित शहा यांना हलका ताप, दिल्लीतील एम्समध्ये केले दाखल




स्थैर्य, नवी दिल्ली, दि. १८ :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी रात्री त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एम्स रुग्णालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अमित शाह यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु नुकतीच उपचारानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.


अमित शाह यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून एम्सचे अध्यक्ष डॉ. रणदीप गुलेरीया यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. अमित शाह यांची प्रकृती ठिक असून ते रुग्णालयातून आपलं काम पाहणार असल्याची माहितीही रुग्णलायाकडून देण्यात आली आहे.


अमित शाह यांना २ ऑगस्ट रोजी करोनाची लागण झाली होती. अमित शाह यांनीच स्वत: ट्विट करत ही माहिती दिली होती. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमित शाह मेदांता रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी अमित शाह यांनी संपर्कात आलेल्यांना स्वत:चं विलगीकरण तसंच चाचणी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी त्यांनी आपली करोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती दिली होती. तसंच डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढचे काही दिवस मी स्वतःला होम क्वारंटाइन करणार असल्याचं शाह यांनी सांगितलं होतं.

Previous Post Next Post