खरेदीसाठी उतरलेल्या सातारकरांमुळे सर्व मुख्य रस्ते व बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी

 स्थैर्य, सातारा, दि. २१ :  गणरायाच्या आगमनाला अवघा एक दिवस बाकी असताना  सातारकरांनी गणपती बाप्पा मोरया म्हणत कोरोनाची ऐशी तैशी वाजवल्याचे चित्र शहरातील रस्त्यांवर व बाजारपेठेत पहावयास मिळाले. पावसात फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांना तिलांजली देत हरितालिका व बाप्पांच्या आगमनाच्या तयारीसाठी खरेदीसाठी उतरलेल्या सातारकरांमुळे सर्व मुख्य रस्ते व बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.


शनिवारी गणरायाचे आगमन होत आहे. दरम्यान, लागणार्‍या विविध वस्तूंची खरेदी तसेच शुक्रवारी आणि शनिवारी गर्दी होणार हे गृहीत धरून नागरिकांनी गुरुवारी शहरातील बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. शहरातील मोती चौक, राजवाडा, खण आळी, शनिवार चौकापासून वरचा रस्ता, मंडई या ठिकाणी दुतर्फा बसलेल्या विक्रेत्यांकडे असलेल्या वस्तू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. यामध्ये महिलावर्ग मोठ्या संख्येने बाहेर पडला होता. कोरोनामुळे सायंकाळी 7 वाजता सर्व दुकाने बंद होणार असल्याने दुपारी या गर्दीने उच्चांकच मोडला. 


गणरायाचे आगमन जरी शनिवारी होणार असले तरी अनेकांनी गुरुवारपासूनच मूर्ती घरी नेण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी शनिवारी गर्दी होणार हे गृहीत धरून आजच बाप्पांसाठी लागणार्‍या विविध वस्तू, तसेच सजावटीसाठी लागणार्‍या वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. हरितालिकेच्या पूजेसाठी लागणारी फुले, पाने, दुर्वा व हरितालिकेच्या मूर्ती खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya