म्हसवड शहरात ४ नवे कोरोना रुग्ण, तर २ बाधितांचा मृत्यु

मृत कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार करताना म्हसवड पालिकेचे कोरोना योध्दे

 


स्थैर्य, म्हसवड, दि. ३० : म्हसवड शहरात कोरोनाचे अक्षरशा थैमान सुरु असुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करणे गरजेचे बनले असतानाच आज दि.३० रोजी आलेल्या कोरोना अहवालानुसार शहरात आणखी ४ नव्या कोरोना रुग्णाची भर पडली आहे, तर येथील कोव्हीड सेंटर मध्ये दाखल असलेल्या दोन कोरोना बाधितांचा मृत्यु झाला आहे यामुळे मात्र शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.


म्हसवड शहराचा कोरोना आलेख हा दररोज वाढत असताना काहीजण मात्र बेफीकीरपणे मोकाट फिरत असल्याचे चित्र असुन त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने शहराचा कोरोना आलेख हा वाढु लागला आहे. म्हसवड शहरात दि. ३० रोजी नव्या ४ रुग्णांची भर पडली असुन यापैकी दोघेजण हे येथील शिक्षक कॉलनी येथील तर दोघेजण येथील माळीगल्ली येथील रहिवाशी आहेत, या ४ ही बाधितांची हिस्ट्री तपासण्याचे काम आरोग्य विभागा कडुन सुरु आहे. तर म्हसवड शहरात दोन दिवसांपुर्वी सुरु झालेल्या कोव्हीड सेंटर मध्ये आजअखेर ४ जणांचा मृत्यु झाला आहे. शहरातील कोव्हीड सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका ५७ वर्षीय पुरुषाचा तर एका वयोवृध्द महिलेचा आज दि. ३० रोजी उपचारादरम्यान मृत्यु झाला असुन या दोन्ही मृतांवर म्हसवड नगरपरिषदेच्या कोव्हीड योध्द्यांकडुन शासकीय नियमांप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ लक्ष्मण कोडलकर, मुख्याधिकारी सचिन माने, स.पो.नि. गणेश वाघमोडे, सागर सरतापे आदीजण उपस्थित होते.


दरम्यान आज ज्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत त्या परिसरात पालिकेकडुन निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यात आली असल्याची माहिती पालिकेकडुन देण्यात आली.


शहरात फिरतायेत कोरोनाचे मानवी बॉंब 

म्हसवड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना बाधितांच्या संपर्कातील निकटवर्तीय व्यक्ती ह्या शहरात बिनदास्तपणे फिरत असल्याचे चित्र असुन त्यांच्याकडुनच कोरोनाचा प्रसार होत असल्याचा आरोप म्हसवडकर जनतेतुन केला जात आहे त्यांच्यावर कारवाई करुन शहरातील अशा कोरोनाच्या मानवी बॉंब ला प्रशासनाने ताब्यात घ्यावे अशी मागणी होत आहे.Previous Post Next Post