स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 मध्ये कराड नगरपरिषद पुन्हा अव्वल येईल

 स्थैर्य, कराड, दि. 16 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी उपक्रम असणार्‍या स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 चा निकाल 20 ऑगस्टला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, नवी दिल्ली येथे जाहीर करणार आहेत. गेल्या वर्षी या स्पर्धेत कराड नगरपरिषदेला 1 लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळाला होता. 2020 सालच्या स्पर्धेतही कराड नगरपरिषद देशात अव्वल क्रमांकावर असेल, असा विश्‍वास जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी व्यक्त केला.


याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात यादव यांनी म्हटले आहे, कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षीचे पारितोषिक वितरण व्हर्च्युअल  पद्धतीने होणार आहे. स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या निकालाबाबत सर्वत्र उत्सुकता आहे. गतवर्षी कराड नगरपरिषदेने कराडकर नागरिक व महिलांच्या सहकार्याच्या जोरावर देशातील सुमारे 4 हजार शहरांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला हाता. यावर्षीही कराड नगरपरिषद या स्पर्धेत अव्वल क्रमांकावर असणार आहे. केंद्रीय नगरविकास व शहरी आवास मंत्रालयाकडून नगरपालिकेस याबाबतच पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे कराड नगरपरिषदेचा क्रमांक निश्‍चित आहे. याची घोषणा स्वत: नरेंद्र मोदी करणार असून कराड नगरपरिषदेचे हे भाग्य असणार आहे.


कराड नगरपरिषदेने स्वच्छ सर्व्हेक्षणामध्ये 2018 व 2019 या दोन्ही वर्षात चांगली कामगिरी केली होती. 2020 यावर्षीही नगरपरिषद चांगली कामगिरी करेल, असा विश्‍वास आहे. कराडकर नागरिक विशेषत: महिलांनी कराड पालिकेच्या स्वच्छता विषयक उपक्रमांना भरघोस पाठिंबा दिला. त्यामुळे कराड पालिका स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये अग्रेसर राहिली. पालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांचे यामागे अथक परिश्रम आहेत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका व गट नेते, स्वच्छतादूत, 105 सामाजिक संस्था, त्यांचे प्रतिनिधी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार यांचेही सहकार्य लाभले आहे.  मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचा हे यश मिळवण्यात सिंहाचा वाटा आहे.


100 टक्के कचरा संकलन, 100 टक्के विलगीकरण, 100 टक्के प्रक्रिया करण्यात नगरपालिका यशस्वी झाली आहे. त्यामुळे  नगरपालिकेस कचरामुक्त शहराचे थ्री स्ट्रार मानांकन  मिळाले आहे. कृष्णा नदीचे सौंदर्यीकरण, संपूर्ण शहरात भूमिगत गटार योजना, सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा शेतीसाठी पुनर्वापर, अत्याधुनिक सार्वजनिक शौचालये,  सुमारे 1 हजार घरात ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया, बारा डबरे येथील जुना कचरा हटवून उभारलेले स्वच्छता प्रेरणा उद्यान अशा विविध पातळ्यांवर नगरपरिषदेने यश मिळवले आहे.


2019 मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर 2020 मध्ये प्रथम क्रमांक कायम राखणे आव्हानात्मक होते. देशभरातील विविध नगरपालिकांनी चांगली तयारी करत स्पर्धेत भाग घेतला होता. या परिस्थितीत कराड नगरपालिकेने 2020 मध्ये आणखी जोमाने काम केले आहे. त्यामुळे नगरपालिकेचा अव्वल क्रमांक निश्‍चित आहे.

Previous Post Next Post