आता घर घेणे होणार आणखी स्वस्त, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय


 


दि.1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत 3% : 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत 2 %


स्थैर्य, मुंबई, दि. २७ : मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला आहे. या निर्णयानुसार खरेदी-विक्रीच्या दस्तावरील मुद्रांक शुल्क दि.1 सप्टेंबर 2020 पासून ते दि.31 डिसेंबर 2020 पर्यंत या कालावधीत तीन टक्‍के, तर दि.1 जानेवारी 2021 ते दि. 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क 2 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे घर खरेदीदारांना दिलासा तसेच बांधकाम क्षेत्राला चालना मिळणार आहे.

करोनाच्या संकटामुळे विविध क्षेत्राला दिलासा देण्याबाबत शासन स्तरावरून चर्चा सुरू आहे. करोनामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन मुद्रांक शुल्कात कपात करावी, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. यावर थोरात यांनी मुद्रांक शुल्कात कपात करण्यासंदर्भातचा प्रस्ताव नोंदणी विभागाकडून मागविण्यात आला होता. त्यावर बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्‍कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे अडचणीत असलेल्या बांधकाम क्षेत्राला चालना मिळणार आहे.


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून सुमारे 27 रजिस्टर कार्यालय आहेत. या सर्व कार्यालयात मिळून दरदिवशी सुमारे आठशेहून अधिक दस्त होतात. तर वर्षभरात सुमारे 28 ते 30 हजार दस्त नोंदवले जातात. करोनामुळे सध्या दस्तनोंदणी कमी होत असली, तर मुद्रांक शुल्कात सवलत मिळाल्यामुळे घरे खरेदी करण्यास चालना मिळणार आहे.


राज्य सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत चांगला व सकारात्मक आहे. करोना काळात ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला या निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना गती मिळेल. विकसकांची, क्रेडाईची अनेक दिवसांपासूनची प्रलंबित मागणी या निर्णयामुळे पूर्ण होताना दिसत आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषत: लहान घरांच्या खरेदीसाठी हा निर्णय प्रोत्साहन देणारा ठरेल. या निर्णयासोबत केंद्र सरकारनेही प्राप्तिकराची सवलत वाढवून दिल्यास एकूणच अर्थव्यवस्थेला आणखी गती मिळेल.

- सतीश मगर, अध्यक्ष, क्रेडाई नॅशनल


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya