लोकनेते राजारामबापू यांचे कार्यकर्तृत्व महाराष्ट्रासाठी दिशादर्शक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 स्थैर्य, मुंबई, दि.१२ :  लोकनेते राजारामबापू पाटील यांची पिढी अतिशय अनुभव संपन्न असून बापूंचे कार्यकर्तृत्व महाराष्ट्रासाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवन येथे केले.


लोकनेते राजारामबापू पाटील जन्मशताब्दी समारोह कार्यक्रम आज विधानभवन येथे आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नरहरी झिरवाळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री श्री. ठाकरे पुढे म्हणाले, राजारामबापू हे अतिशय स्वच्छ व चारित्र्यवान नेतृत्व होते. त्यांचा काळ पाहिला असता असे लक्षात येते की, ती  पिढी कर्तृत्ववान व  नशिबवान आहे दिग्गज मंडळी आजूबाजूला असल्यामुळे ते नशिबवान तर कार्य कर्तृत्वाने घडत गेल्यामुळे कर्तृत्ववान. बापू नुसते घडले नाही तर त्यांनी पिढी घडवली. लोकनेते, पदयात्री, असलेल्या राजारामबापू यांनी केलेल्या कार्यामध्ये मजूर वर्ग, शेतकरी, उद्योग सर्वसामान्य अशा सर्वांच्या विकासाचा समावेश आहे. त्यांचाच वारसा लाभलेले जयंतराव पाटील सहकारी असल्याचा अभिमान वाटतो असेही मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितले.
राजारामबापूचे कार्य महत्त्वपूर्ण व प्रगतीपथावर – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजारामबापूंच्या स्मृतीस अभिवादन करुन सांगितले की, राजारामबापूचे कार्य हे महाराष्ट्राच्या कायमस्वरुपी लक्षात राहील असेच आहे. त्यांनी अतिशय कठीण काळामध्ये बदल घडविण्याचे कार्य केले. विकासास गती देण्याचे काम केले. आजही त्यांच्या वाळवा तालुक्यातील विविध सहकारी संस्था या उत्तमरितीने सुरु आहेत. हीच त्यांच्या कार्याची पावती आहे. विकासाच्या दृष्टीने केवळ तालुकाच नाहीतर राज्यस्तरावर देखील त्यांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहे. तुलनात्मकदृष्ट्या त्यांना कमी आयुष्य लाभले तरी त्यांनी केलेले कार्य हे महत्त्वपूर्ण व प्रगतीपथावर नेणारे आहे.


सर्वांगिण विकासास मोठा हातभार – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

राजाराम बापू पाटील यांच्या स्मरणार्थ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या दिग्गज लोकनेत्यांनी सामाजिक आणि आर्थिक विकासाचा मार्ग महाराष्ट्राला दाखविला त्यापैकी राजाराम बापू हे एक आहेत. त्यांना पदयात्री म्हणून संबोधणे म्हणजेच त्यांच्या कार्याची नाळ जनतेशी जोडली होती याचे उत्तम उदाहरण होय. त्यांनी विविध विभागाचे मंत्री म्हणून कार्यभार उत्तम रितीने सांभाळून कर्तृत्व सिद्ध केले. ऊर्जामंत्री असताना १४ हजार गावांत वीज पोहोचविणे आणि एमआयडीसी उभारुन औद्योगिकीकरण करणे, साखर कारखाना, सुतगिरण्या सुरू करून राज्याच्या सर्वांगिण विकासास मोठा हातभार राजाराम बापू पाटील यांनी लावला आहे.


समृद्ध महाराष्ट्र उभारण्यात मोठा वाटा – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, देशात परिवर्तनाची लाट असताना त्याचे राज्यात नेतृत्व करण्याचे काम बापूंनी केले. समृद्ध जीवनाचे व्यक्तीमत्व म्हणजे बापू होत. स्वातंत्र्यानंतरसुद्धा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत काँग्रेसने पाय रोवून उभे करण्याचे काम बापूंनी केले. स्वातंत्र्यानंतर २५ वर्षात समृद्ध महाराष्ट्र उभा राहिला यात मोठा वाटा स्व. यशवंतराव चव्हाण यांचा दृष्टीकोन आणि स्व. राजाराम बापूंच्या नेतृत्व व कर्तृत्वाचा आहे.


कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री तसेच इतर मान्यवरांनी स्व.राजारामबापूंच्या प्रतिमेस पुष्पअर्पण केले. दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी लोकनेते राजारामबापू यांच्या कार्यावर आधारित चित्रफित दाखविण्यात आल्या. तसेच नितिश भारती या कलावंताने वाळूच्या माध्यमातून स्व. बापूंच्या कार्याचा इतिहास विविध कलाकृतीने अतिशच मोहकपणे उपस्थितांच्या समोर सादर केले.
आपल्या प्रास्ताविकातून जयंत पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तसेच लोकनेते राजारामबापू यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमांची थोडक्यात उजळणी केली. स्व. राजारामबापूंच्या पुण्याईवर मी उभा असून त्यांचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. या शब्दात आपले मनोगत व्यक्त कले.


यावेळी औरंगाबादचे माजी मंत्री डॉ. नामदेव गाडेकर यांनी स्व. राजारामबापू म्हणजे सर्वसाधारण कार्यकर्त्यांना लक्षात ठेवणारा त्यांची आस्थेनी चौकशी करणारा नेता अशा शब्दात व आ. बबनराव पाचपुते यांनी स्व. राजारामबापू यांच्या आठवणी सांगून समयोचित भाषण केले.ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी स्व. राजारामबापू यांच्या विविध आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सोशल डिस्टन्सींगचे पालन करत हा कार्यक्रम संपन्न झाला.

Previous Post Next Post

⭕ दैनिक स्थैर्य आता WhatsApp वर आहे. आमचा ग्रुप (Sthairya WhatsApp Group) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता फेसबुकवर आहे. आमचं पेज (https://www.facebook.com/dailysthairya) लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता ट्विटरवर आहे. आमचं अकाउंट (https://twitter.com/DSthairya) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


⭕ दैनिक स्थैर्य आता इंस्टाग्रामवर आहे. आमचं अकाउंट (https://www.instagram.com/dailysthairya/) फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.