पावसामुळे खरीप हंगामातील मूग व घेवडा या कडधान्याच्या पिकांचे मोठे नुकसान


 


स्थैर्य, कराड, दि. ३० : उंडाळे व येळगाव परिसरात पावसामुळे खरीप हंगामातील मूग व घेवडा या कडधान्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


यावर्षी जूनच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्‍यांनी खरीप हंगामाच्या पेरण्या, टोकणी लवकर केली. त्यानंतर 15 दिवस पाऊस सुरू राहिला. जुलैमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. त्या कालावधीत शेतकर्‍यांनी पिकाच्या आंतरमशागती पूर्ण केल्या. ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली. खरीप हंगामातील सर्वच पिके जोमात आली; पण सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले. आडसाली लागणीच्या भुड्यावर भुईमूग, घेवडा, टोकणी केली. पेरणी केलेल्या शेतात अती पावसामुळे पाणी साचल्यामुळे घेवडा कुजून गेला. काही ठिकाणी कडधान्याला मोड आल्याची स्थिती आहे.


सध्या शेतकरी शेतामध्ये कुजलेली कडधान्याची पिके शेतातून बाहेर काढून टाकत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले. दुसरीकडे पाऊस जास्त झाल्यामुळे परिसरातील धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. भरपूर पावसामुळे येळगाव परिसरातील येणपे, येवती, भुरभुशी, गोटेवाडीतील भाताचे पीक चांगले आहे. कडधान्याच्या पिकांचे मात्र मोठे नुकसान झाल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. 
Previous Post Next Post