उधारीवर नेलेल्या सौदयाचे पैसे मागीतल्याच्या कारणावरून एकास लोखंडी रॉडने मारहाण
स्थैर्य, नागठाणे, दि. 1 : उधारीवर नेलेल्या सौदयाचे पैसे मागीतल्याच्या कारणावरून नागठाणे(ता.सातारा) येथील एकास लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी येथीलच चार जणांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शशिकांत राजेंद्र काळे,अमित राजेंद्र काळे,राजू आंदू काळे व समिर राजू काळे( सर्व रा.बेघरवस्ती, नागठाणे,ता.सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.मारहाणीत अनिल रमेश वाळे (रा.बेघरवस्ती, नागठाणे, ता.सातारा) हा गंभीर जखमी झाला असून या घटनेची फिर्याद त्याचा भाऊ विजय रमेश वाळे याने दिली आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शशिकांत काळे याने अनिल वाळे याच्याकडून सौदा उधारीवर नेला होता.गुरुवारी सायंकाळी अनिल वाळे हा उधारीचे पैसे घेण्यासाठी शशिकांत काळे याच्या घरी गेला.यावेळी शशिकांत काळे याने लोखंडी रॉडने अनिल वाळे यांच्या डोक्यात मारहाण केली.तर अमित काळे,राजू काळे व समीर काळे यांनी लाथा-बुक्क्यांनी त्याला मारहाण केली.

या मारहाणीत अनिल वाळे हा गंभीर जखमी झाला.त्यांच्या मारहाणीतून सोडवून विजय व त्याच्या कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी नागठाणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.त्याची परिस्थिती गंभीर असल्याने शुक्रवारी त्याला पुढील उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.शनिवारी दुपारी भाऊ विजय वाळे याने या घटनेची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली.
Previous Post Next Post