नारकर कुटुंबाकडून मंडळाच्या गणपतीची सलग 30 वर्षे सेवास्थैर्य, सातारा, दि. २४ : गणपती हे अनेकांचे पूजनीय दैवत आहे, किंबहुना सर्व देवांमध्ये गणेशभक्तांची संख्या सर्वाधिक असण्याचीच दाट शक्यता आहे. गणरायाची सेवा अनेकजण करत असतात. मात्र मंगळवार पेठेतील मंगळवार तळे गणेशोत्सव मंडळाच्या बक्षीसपात्र मूर्तीची 30 वर्षे सेवा अखंडितपणे करणारे नारकर कुटुंबीय याबाबतीत गणरायाच्या भक्तीचा समृद्ध वारसा जपणारे सातारा शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील एकमेव कुटुंब असावे.


1968 साली मंगळवार तळे परिसरातील तत्कालीन तरुणांनी मंगळवार तळे गणेशोत्सव मंडळ नावाचे एक मंडळ स्थापन केले होते. 1980 मध्ये या मंडळाची सूत्रे तत्कालीन तरुणाईकडे आली आणि त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. 1989 मध्ये एका लग्नपत्रिकेवर छापलेल्या गणपतीच्या चित्रावरून असाच गणपती त्या वर्षी करण्याचे ठरवण्यात आले. त्यावेळी शहरातच नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले के. डी. कुंभार या पंताचा गोटातील मूर्तिकाराकडे हे काम सोपवण्यात आले. विशेष म्हणजे ही मूर्ती एकाच रंगात आणि तीही लाकडाच्या फॉर्ममध्ये तयार करण्यात आली. अर्थात के. डीं. सारख्या जातिवंत कलाकाराने अत्यंत मन लावून काम केल्याने ही मूर्ती अत्यंत देखणी झाली. के. डी. कुंभार हे भवानी विद्यामंदिर येथे कलाशिक्षक होते. त्यांनी असंख्य मूर्ती साकारल्या. त्यातील ही केवळ एकच शाडूची मूर्ती आज अस्तित्वात आहे. योगायोग असा, की त्या वर्षीचे सुंदर मूर्तीचे बक्षीस या मूर्तीला मिळाले. त्यामुळे या मूर्तीचे विसर्जन करू नये असे ठरवण्यात आले आणि ही मूर्ती त्यावर्षी एकाकडे ठेवण्यात आली.


योगायोगाने पुढील वर्षी म्हणजे 1990 साली मंडळाचे एक सक्रिय सभासद उमेश नारकर हे जी. डी. आर्टचे शिक्षण घेवून सातार्‍यात आले. त्यांनी पेठेतील राहत्या घरातच चंदन फोटो स्टुडिओ सुरू केला. त्यावर्षीपासून गणेशोत्सव संपल्यानंतर ही मूर्ती त्यांच्या स्टुडिओत ठेवण्यात आली. त्या वर्षापासून आजअखेर ही मूर्ती त्यांच्या स्टुडिओत आहे. त्यावर्षीपासून या मूर्तीची नारकर कुटुंबीयांकडून दररोज पूजा केली जाते. प्रत्येक चतुर्थीला आरती, 21 मोदकांचा नैवेद्य, प्रत्येक सणाला पुष्पहार आणि गणेश जयंतीला मूर्तीला चांदीचे दागिने घालून अभिषेक, अथर्वशीर्ष आवर्तने, प्रसाद वाटप हे सगळे सोपस्कार पार पाडले जातात. विशेष म्हणजे या सेवेत आजपर्यंत कधीही, कोणत्याही कारणाने खंड पडलेला नाही.


प्रत्येक वर्षी गणपतीचे रंगरंगोटीचे काम उमेश नारकर करतात तर दैनंदिन पूजेचे काम त्यांचे बंधू नितीन नारकर करतात. आता त्यांची दुसरी पिढी या गणरायाच्या सेवेत आहे. नितीन नारकर यांचे चिरंजीवही आता याकामी काका आणि वडिलांना मदत करत आहेत. ज्या काळात गणपतीची शाडूची अगर प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती जतन करून ठेवण्याची परंपरा नव्हती त्या काळापासून मंडळाने ही मूर्ती जपली आहे. आजही हीच मूर्ती गणेशोत्सव काळात मंडपात बसवली जाते.


नारकर कुटुंबाकडून गणरायाच्या सेवेत कधीही खंड पडणार नाही, अशी ग्वाही उमेश आणि नितीन या नारकर बंधूंनी दिली आहे.