म्हसवड शहरातील खाजगी रुग्णालये अधिग्रहण करणार - प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे

खाजगी रुग्णालयाची पाहणी करताना प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसिलदार बाई माने, डॉ. लक्ष्मण कोडलकर नगराध्यक्ष तुषार विरकर आदी.
 


स्थैर्य, म्हसवड दि.२५ : म्हसवड शहरात कोरोना रुग्णाने शंभरी पार केली असल्याने येथील क्वॉरंटाईन सेंटर मध्ये बाधित रुग्णांना दाखल करण्यास बेड शिल्लक नसल्याने शहरातील तीन खाजगी रुग्णालये प्रशासनाकडुन ताब्यात घेतली जाणार असल्याची माहिती माण - खटावच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी दिली.


म्हसवड शहरातील रुग्णांवर शहरातच उपचार व्हावेत याकरीता शहरातील ३ खाजगी रुग्णालये प्रशासनाने अधिग्रहण करावेत याच्या सुचना जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दिल्याने प्रांताधिकारी जिरंगे यांनी आज म्हसवड येथे भेट देवुन शहरातील जय भगवान मल्टीस्पेशलीटी, धन्वंतरी रुग्णालय, रत्नदिप मल्टीस्पेशलीटी रुग्णालय, दोलताडे हॉस्पिटल भेट देवुन सदर रुग्णालयाची पाहणी केली यावेळी माणच्या तहसिलदार बाई माने, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, मुख्याधिकारी सचिन माने, नगराध्यक्ष तुषार विरकर, स.पो.नि. गणेश वाघमोडे, तलाठी यु.एन.आखडमल, डॉ. भारत काकडे आदी प्रमुख उपस्थित होते.


प्रांताधिकारी जिरंगे यांनी पाहणी केलेल्या रुग्णालयापैकी एक रुग्णालय प्रशासन त्वरीत ताब्यात घेणार असुन यापुढे त्या रुग्णालयात म्हसवडसह परिसरातील कोरोना बाधित रुग्णांना ठेवले जाणार असल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले.