गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईंनी केली पुरपरिस्थितीची पहाणी

 पुरपरिस्थितीवर मी स्वत: लक्ष ठेवून, तालुक्यातील शासकीय यंत्रणा सतर्क


स्थैर्य, दौलतनगर दि.१९ : आजमितीला कोयना धरणामध्ये ९२.१७ टीएमसी पाणीसाठा असल्याने सध्या कोयना धरणातून ५५,४८६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सलगपणे सुरु आहे. त्यामुळे तालुक्यातील नेरळे व मुळगांव येथील पुल पाण्याखाली गेले आहेत. ५५,४८६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असूनही पुरपरिस्थिती अटोक्यात आहे. पावसाचा जोर हळू हळू कमी होवू लागला आहे. कोयना धरणातील पाणी सोडणेसंदर्भातील योग्य नियोजन कोयना धरण व्यवस्थापनाने केले आहे त्यामुळे मागीलप्रमाणे यंदा पुराची परिस्थिती निर्माण होणार नाही तरीही मी स्वत: पुरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहे तसेच तालुक्यातील शासकीय यंत्रणाही सतर्क असल्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.


गेली चार ते पाच दिवसांपासून सातत्याने पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसाचे पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज मुळगाव व नेरळे येथील पाण्याखाली गेलेल्या कोयना नदीवरील पुलांची शासकीय अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालयाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृहात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व नियोजनासंदर्भात तालुका प्रशासनाची बैठक घेण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते.


यावेळी बैठकीस प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,तहसिलदार समीर यादव,नायब तहसिलदार प्रशांत थोरात, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता शशिकांत गायकवाड,वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता ए.व्ही.राख,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी,उपविभागीय जलसंधारण अधिकारी अविनाश पदमाळे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील,जि.प.बांधकाम विभागाचे आर.एस.भंडारे,पाणी पुरवठा विभागाचे ए.वाय. खाबडे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. चंद्रकांत यादव,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील, कोयनानगरचे सपोनी एम.एस.भावीकट्टी यांची उपस्थिती होती.


याप्रसंगी बोलताना ना.शंभूराज देसाईंनी सांगितले,पुरपरिस्थिती संदर्भात यापुर्वी तालुका प्रशासनाच्या दोन तीन बैठका घेवून योग्य नियोजन केले आहे. आपत्ती काळात योग्य व्यवस्थापन व नियोजन करुन तालुका प्रशासनाने सतर्क रहावे यामध्ये हलगर्जीपणा करु नका,जागृत रहा अशा सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तालुक्यातील प्रशासन सतर्क असून कोयना धरणातील पाणी सोडण्यासंदर्भात वडनेरी समितीने ज्या काही गाईडलाईन दिल्या आहेत त्यानुसार कोयना धरण व्यवस्थापनाकडून त्याचे पालन केले जात आहे. गत चार ते पाच दिवसांपासून सातत्याने पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीपातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. सध्या धरणामध्ये ९२.१७ टीएमसी पाणीसाठा  झाला आहे. धरणाचे सहा वक्र दरवाजे १० फुटांनी उघडून धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पुरपरिस्थिती अटोक्यात आहे.मागील वर्षाप्रमाणे यंदा पुरपरिस्थिती निर्माण होईल अशी कोणतीही परिस्थिती नाही.तसेच पावसाचे प्रमाण पाहून कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करणेसंदर्भातील नियोजनही करण्याच्या सुचना कोयना धरण व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. असे सांगत त्यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाने कुठे दरड पडली असेल तेथील वाहतूक सुरुळीत करणेसंदर्भातही सुचना केल्या.कृष्णा खोरेच्या वांग मराठवाडी,उत्तरमांड,तारळी व मोरणा गुरेघर धरणातील पाणीसाठयासंदर्भात बैठकीत माहिती घेतली तसेच आरोग्य विभागाचाही या बैठकीत त्यांनी आढावा घेतला.


तर... मला डायरेक्ट फोन करा- ना.शंभूराज देसाई.

उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे नियंत्रणाखाली तहसिल कार्यालयात २४ तास आपतकालीन व्यवस्थापन कक्ष स्थापन उभारले आहे.आपत्ती काळात काही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ या कक्षामध्ये प्रथमत: माहिती दया. प्रशासन सतर्क आहेच परंतू कसलीही अडचण भासल्यास डायरेक्ट मला फोन करा असेही आवाहन ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत केले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya