संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे निधन

 स्थैर्य, मुंबई, दि. 17 : प्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेतील न्यू जर्सी येथे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.


मेवाती घराण्याचे पंडित जसराज यांचे सुरुवातीचे शिक्षण वडील पंडित मोतीराम यांच्याकडे झाले. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी गायक म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली तर 22 व्या वर्षी गायक म्हणून त्यांनी पहिला स्टेज शो केला. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.


त्यांची मुलगी दुर्गा जसराज म्हणाल्या, की ‘अतिशय जड अंतःकरणाने सांगावे लागत आहे, की पंडित जसराज यांचे अमेरिकेतील न्यू जर्सी येथे पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.’ ‘आम्ही प्रार्थना करतो, की भगवान श्रीकृष्ण त्यांचे प्रेमाने स्वर्गात स्वागत करेल. तिथे आता पंडितजी ओम नमो भगवते वासुदेवाय हे गाणं फक्त त्यांच्या प्रिय देवासाठी गातील. आम्ही प्रार्थना करतो, की त्यांच्या आत्म्यास नेहमी संगीतमय शांती मिळो.’

28 जानेवारी 1930 मध्ये जन्मलेल्या पंडित जसराज यांना संगीताचा वारसा लाभला होता. त्यांचा जन्मच अशा कुटुंबात झाला ज्याच्या चार पिढ्या संगीत साधनेत होत्या. वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ पंडित मणिराम यांनीच जसराज यांचा सांभाळ केला होता. हरियाणातील हिसार येथील जसराज यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या मुलीशी मधुरा शांताराम यांच्याशी विवाह केला होता. 1960 च्या सुमारास मधुरा आणि जसराज यांची ओळख मुंबई येथे झाली होती.


शास्त्रीय संगीतातला तारा निखळला : ना. देशमुख

दरम्यान, सुमधुर आवाजाची देणगी मिळालेले पंडित जसराज यांनी भारतीय संगीतासाठी आपले संपूर्ण जीवन वाहून घेतले होते. भारतीय संगीत आणि पंडित जसराज हे जणू समीकरणच झाले होते. पंडित जसराज यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातला तारा निखळला असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.


पंडित जसराज यांचे वडील मोतीराम हेसुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते. पंडितजींना आपल्या वडिलांकडून संगीताचा वारसा मिळाला. संघर्ष, मेहनत आणि रियाझ यातून भारतीय संगीतसृष्टीला त्यांनी योगदान दिले. आपल्या गायनातून श्रोत्यांना ईश्‍वर अनुभूती देणारे, देश-विदेशातल्या विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देणारे पंडितजी हे संगीत क्षेत्रातले गान गुरू होते. शास्त्रीय गायनासाठी त्यांना आजपर्यंत अनेक सन्मान, पुरस्कार मिळाले असून केंद्र शासनाने पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रात भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.


पंडितजींच्या निधनाने दु:ख : राजनाथ सिंह

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या निधनाने मोठे दु:ख झाले आहे. मेवाती घराण्याशी निगडित पंडितजींनी आपले संपूर्ण जीवन सूर साधना करण्यात घालवले. सुरांच्या संसाराला त्यांनी आपल्या कलेने नव्या शिखरावर पोहोचविले. ईश्‍वर त्यांना आपल्या चरणी स्थान देवो, हीच प्रार्थना, अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंडित जसराज यांना आदरांजली वाहिली.


पंडित जसराज यांच्या नावाने ग्रह

शास्त्रीय गायनाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणार्‍या पंडित जसराज यांच्या नावाने एक ग्रहही अंतराळात आहे. आंतरराष्ट्रीय खगोल संघाने मंगळ आणि गुरू या दोन ग्रहांच्या मधे असलेल्या एका ग्रहाचे नाव पंडित जसराज असे ठेवले आहे. हा बहुमान मिळालेले ते पहिले भारतीय कलावंत ठरले. मंगळ आणि गुरू यांच्या मधे असलेला एक लहान ग्रह 2006 व्हिडी 32 असा आहे. या ग्रहाचा शोध 2006 मध्ये लागला होता. या ग्रहाला पंडित जसराज यांचे नाव देण्यात आले.


पंडित जसराज यांना मिळालेले पुरस्कार

पद्मश्री पुरस्कार, संगीत अकादमी पुरस्कार, पद्मविभूषण, पु. ल. देशपांडे जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, गंगुबाई हनगल जीवनगौरव पुरस्कार.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya