म्हसवड शहरात कंन्टेटमेंट झोन नावाला, अन कोरोना सार्या गावाला

 स्थैर्य, म्हसवड दि. २१ : म्हसवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढु लागले असुन ज्या भागात अशा प्रकारचे रुग्ण सापडत आहेत तो भाग नगरपरिषदेकडुन कंन्टेटमेंट झोन म्हणुन जाहीर केला जात असुन तो काठ्या आडव्या लावुन सिल केला जात आहे, मात्र त्या आडव्या केलेल्या काठ्या बाजुला करुन त्या परिसरातील नागरीकांची ये - जा ही सुरुच रहात असल्याने कन्टेटमेंट झोन फक्त नावालाच पालिकेकडुन केला जात असल्याचे समोर येत आहे मात्र या तकलादु उपाययोजनांमुळे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.


म्हसवड शहर हे सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरु लागले असुन दररोज ८ ते १० नवीन रुग्ण शहरात सापडु लागले आहेत. यावर निर्बंध आणण्यासाठी पालिका प्रशासनाकडुन कोणतीच अशी खास खबरदारी घेत नसल्याचे दिसुन येत आहे. शहरात सध्या ६३ रुग्ण आहेत तर शहरातील एकट्या भगवानगल्लीत जवळपास १५ हुन अधिक रुग्ण आहेत त्यामुळे पालिकेने हा परिसर कंन्टेटमेंट झोन म्हणुन जाहीर करीत तो सिल केला आहे,  पालिकेने हा परिसर सिल करताना त्याठिकाणी असलेल्या रस्त्यावर आडव्या काठ्या लावल्या आहे व त्यावर प्रवेश बंदचे फलक लावले आहेत. मात्र पालिकेने हा परिसर नाममात्र सिल केल्याने याठिकाणी लावलेल्या काठ्या काढुन येथील नागरीकांची वर्दळ गावभर सुरु आहे. विषेश म्हणजे शहरातील ज्या घरात कोरोनाचे पॉझीटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत त्या घरातील इतर सदस्य बिनदास्तपणे गावभर फिरत असल्याने शहरातील कोरोना बाधिताचा आकडा हा दररोज वाढत आहे. दररोज वाढणारा हा आकडा प्रशासनाची डोकेदुखी वाढवत असल्याने पालिका प्रशासनानेही याकडे गांभीर्याने पाहणेच सोडुन दिल्याचा आरोप म्हसवडकर जनतेतुन केला जात आहे. तर पालिकेने यावर उपाययोजना म्हणुन पालिकेच्या एका कंत्राटी कर्मचार्याला शहरात फिरुन नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्याचे काम दिले असुन गणेश म्हेत्रे नावाचा हा कर्मचारी गत ५ महिन्यांपासुन हे काम अत्यंत चोखपणे बजावत आहे.

म्हसवड शहरात जनता कर्फ्यु ची गरज -

शहरात दररोज वाढणारी गर्दी हीच शहरात कोरोनाला आमंत्रण देणारी ठरत असुन खरेदीच्या नावाखाली शहर व परिसरातील हजारो नागरीक दररोज रस्त्यावर फिरत असल्यानेच शहरातील साथ वाढु लागल्याचे मत अनेकजण व्यक्त करीत असुन शहरातील ही गर्दी कमी करण्यासाठी शहरात पुन्हा एकदा जनता कर्फ्यु सुरु करावा अशी मागणी म्हसवडकर जनतेतुन होत आहे.


तहसिलदारांची तातडीने भेट -

म्हसवड शहरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने शहराची हॉटस्पॉच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याने माणच्या तहसिलदार बाई माने यांनी दि. २० रोजी म्हसवड शहराला भेट देत संपुर्ण परिस्थितीची पाहणी करुन यापुढे सकाळी ९ च्या आत व सायंकाळी ७ नंतर जे दुकान सुरु राहिल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.


पालिकेकडुन तोंड पाहुन कारवाई -

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तहसिलदारांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर पालिकेकडुन सकाळी लवकर व सायंकाळी उशीर पर्यंत सुरु राहणार्या दुकानांवर कारवाईचा बडगा उगारला आहे मात्र ही कारवाई करताना पालिका आपला - तुपला जवळचा - दुरचा असे दुकानदारांची तोंड पाहुन कारवाई करुन त्यांच्याकडुन दंड ही वेगवेगळ्या रकमेचा आकारत असल्याचा आरोप व्यापारीवर्गातुन केला जात आहे.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya