मानसिक ताणावर मात विपश्यना शिबीरातून
कोविड, क्वारंटाईन सेंटर मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी शिबीराचे आयोजन


स्थैर्य, सोलापूर, दि. 31 : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आनापान विपश्यना शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचा तणावमुक्त होण्यासाठी चांगला फायदा झाला, अशी प्रतिक्रिया कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी कार्यरत असणारे अधिकारी, डॉक्टर्स, नर्स व कर्मचारी यांच्यासाठी सोलापूर महापालिका प्रशासनामार्फत दिनांक 28 व 29  जुलै रोजी विपश्यना शिबीर आयोजित केले होते. याबाबत उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे यांनी सांगितले की, दोन कोविड केअर सेंटर व  पाच क्वारंटाईन सेंटर अशा एकूण सात ठिकाणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. विपश्यनेमुळे ताण-तणाव कमी होणे, मानसिक संतुलन कायम ठेवणे आणि कुटुंबापासून दूर राहून सातत्याने करावा लागणाऱ्या कामामुळे येणाऱ्या नैराश्यावर मात करणे शक्य होते. गेल्या दोन दिवसातील शिबीराचा अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगला फायदा झाला आहे.

केगांव येथील इंदिरा गांधी कॉलेज येथे असणाऱ्या विलगीकरण केंद्रातील डॉ.सौरभ लेंगरे यांनी सांगितले की, सतत कामात राहिल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडते. ताण-तणाव आणि नैराश्याला सामोरे जावे लागते. यावर मात करण्यासाठी विपश्यना आनापान शिबीराचा फायदा झाला. भविष्यात सोलापूर महानगरपालिकेच्या मदतीने अशा प्रकारची शिबीरे नियमित कालावधीने आयोजित करण्याचा मानस आहे.

शिबीर समिती प्रमुख केशव शिंदे, श्री.कारंडे, के.एम .कांबळे, डॉ. किरण गजधाने, उपअभियंता रमेश खाडे, आरोग्य उपअधीक्षक वाघमारे, श्री. उकरंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबीर पार पडले.

विपश्यना विद्येचे साधक जिल्हा कोषागार अधिकारी रुपाली कोळी, पोलीस उपअधीक्षक शितल वंजारी, विजय विजापूरे, रवि गजधाने यांचेही या शिबिरास विशेष सहकार्य लाभले.

सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त डॉ. पंकज जावळे, सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील यांनी या शिबीराचे आयोजन केले होते.


Previous Post Next Post