सातार्‍यात चार कृत्रिम तळ्यांचे नियोजन

 बुधवार नाक्यावरील मुख्य विसर्जन तलावातून गाळं काढण्याचे काम सुरू


स्थैर्य, सातारा दि. 18 : कोरोनाचे संकट सुरू असतानाच विघ्नहर्ता गणरायांचे आगमन होत आहे. त्यामुळे सातारा पालिकेनेही गणेशोत्सवासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही चार कृत्रीम तळी व जलतरण तलावात मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली जाणार असून, बुधवार नाक्यावरील मुख्य तळ्यातून पाणी व गाळ काढण्याचे काम सोमवारपासून हाती घेण्यात आले आहे.


सातारा पालिकेकडे मूर्ती विसर्जनासाठी स्वत:ची व्यवस्था नाही. त्यामुुळे 2016 पासून पालिका कृत्रीम तळ्याचे खोदकाम करून त्यामध्ये मूर्ती विसर्जन करीत आहेत. बुधवार नाका परिसरात पालिकेची पाणी साठवण टाकी आहे. या टाकीशेजारी असलेली मोकळी जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. याच जागेवर पालिकेने गतवर्षी 50 मीटर लांब, 25 मीटर रुंद आणि 12 मीटर खोलीच्या तळ्याचे खोदकाम केले. या तळ्यात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तळे बंदिस्त न केल्याने यंदा खोदकामाचा मोठा खर्च वाचणार आहे. 


बुधवार नाक्यावरील कृत्रीम तळ्यात साचलले पाणी व गाळ काढण्याचे काम सोमवारपासून सुरू झाले. तळे गाळमुक्त झाल्यानंतर त्यात प्लास्टिक लायनर टाकून पुन्हा पाणीसाठा केला जाणार आहे. या व्यतिरिक्त सदर बझार येथील दगडी शाळा, गोडोली व हुतात्मा स्मारक येथेही कृत्रीम तळ्याची निर्मिती केली जाणार आहे.


जिल्हाधिकार्‍यांकडू नियमावली जाहीर 

यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे उत्सवासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, देखावे, प्रदर्शन, मिरवणूका आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मंडळांवर गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादाही घालण्यात आली आहे. ज्या मंडळांना मूर्ती विसर्जनाची व्यवस्था नाही अशा मंडळांनी कृत्रीम तळ्यात मूर्ती विसर्जन करावे, असे आदेशही देण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर पालिकेकडून कृत्रीम तळ्यांच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे.

Previous Post Next Post