काजळवड माझा जीवाभावाचा सोबती
स्थैर्य, औंध, दि. ३१ : परवा सायंकाळी वादळी वारा अथवा धुव्वाधार पाऊस नसताना अचानकच औंधचा "काजळवड" उन्मळून पडल्याची धक्कादायक माहिती माझ्या कानावर आदळली. या धक्कादायक बातमीमुळे गलबलून आल्याने मन काही क्षण सुन्न झाले.

3 एप्रिल 1973 वार मंगळवारचा दिवस होता. मंगळवार म्हणजे औंधच्या आठवडा बाजारचा दिवस. दिवस ढळायला लागल्याने नेहमीप्रमाणेऔंधमधून आठवड्याचा बाजार करून गाढाभर पोट घेऊन घराच्या ओढीने माझी आई झपाझप पाऊले टाकत वडी गावाच्या दिशेने निघाली होती. बरोबर वडीलही सोबत होतेच. मात्र औंधमधून बाहेर पडल्यावर हळूहळू आईच्या पोटात वेदना सुरू झाल्या होत्या. परंतु घर गाठायच या ओढीने ती दुखऱ्या वेदनांंचा सामना करीत मोठ्या निर्धाराने वाट कापीत चालली होती. मात्र काजळवडाजवळ आल्यानंतर आई वेदनांनी अगदी असाह्य झाली आणि काही क्षणात तीची प्रसुती झाली. मूळपीठ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या काजळवडाशेजारीच माझा जन्म झाला. त्या काळी वाहनांची कसलीही सोय नव्हती त्यामुळे बाजारला किंवा अगदी दवाखान्यात जायचे म्हटले तरी चालतच पायपीट करावी लागत असे. दिवस मावळायला चालला होता आणिअचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे आई वडीलांना सुचायचे बंद झाले होते. घर अजून अंदाजे पाच किलो मीटर अंतरावर तर मागे औंध दोन किलोमीटर काय करावे वडीलांची द्विधा मनस्थिती निर्माण झाली. जवळ कसलेच साहित्य नाही. आईने धीर एकवटला आणि वडीलांना सांगितले तुम्ही घरी जावा आणि बैलगाडी घेऊन या मी येथेच काजळवडाच्या आडोशाला थांबते. जवळ कपडे नाहीत आणि कोणी मदतीलासुध्दा नाही. आईने अंगावरील साडीच्या पदरात मला गुंडाळून पोटाशी धरुन वडाच्या बुंध्याशी ती बसली होती. वडील झपाट्याने चालत घरी चालले होते. वडील बैलगाडी घेऊन येईपर्यंत आम्ही दोघे मायालेकरे काजळवडाच्या आडोशाला बसून वडीलांची प्रतिक्षा करीत बसलो होतो. कोणीही सोबतीला नसताना माझ्या रडण्याच्या आवाजाने आईही व्याकूळ झाली होती. मात्र काहीच जवळ नसल्याने ती एक एक क्षण डोळ्यात जीव आणून बैलगाडीची वाट पाहत होती. प्रसंग बाका असला तरी खंबीर मनाच्या माझ्या आईने धीर सोडला नाही. अर्थात डोक्यावर जगतजननी मूळपीठ निवासिनी आई जगदंबेची छत्रछाया होती. आणि आपल्या विशाल बुंध्याच्या कवेत घेऊन काजळवडाने मोठा आसरा देऊन आम्हा दोघांना उभारी आणि धीर दिला होता. सायंकाळच्या सुमारास वडील बैलगाडी घेऊन आले आणि बैलगाडीतून आई आणि मी घरी वडीला आलो. तर काजळवडाच्या बुंध्याच्या शेजारीच मी हे नवीन जग पाहिले. जन्मानंतर त्यानेच माझ्या आवाजाला प्रतिसाद दिला आणि सळसळ करीत सोसाट्याच्या खोडकर वाऱ्याला आपल्या अंगावर घेऊन आधार देत आईला आणि मला आपल्या कुशीत घेऊन मायेची उब दिली. खर तर तेव्हा पासूनच माझी काजळवडाची नाळ जुळली.आणि दिवंसेदिवस आमचे नातेही अगदी घट्टही झाले. तेव्हा पासून काजळवडाबद्ल नेहमीच मनात आत्मियता आणि अनामिक ओढ निर्माण झाली होती. मी जेव्हा मोठा झालो तेव्हा आईने मला माझ्या जन्माची गोष्ट सांगितल्यावर काजळवडाशी मैत्री आणखिनच गडद झाली. लहानपणी याच रस्त्याने आम्ही औंधला यात्रेला चालत यायचो तेव्हा चालून चालून दमल्यावर काजळवडाच्या सावलीला विसावा घ्यायचो. आपल्या विशाल फांद्या पसरुन मोठ्या दिमाखात उभा असलेला हा महाकाय व्रुक्ष जणू आमच्या स्वागतासाठी हात पसरुन उभा असल्यासारखे वाटायचे. रस्त्यावरून पंचक्रोशीतील जाणाऱ्या वाटसरुनां आणि वाहनधारकांना त्याचा मोठा आसरा वाटायचा. तो होताही मोठ्या मनाचा उन्हातान्हातून दमून भागून आलेल्या वाटसरुनां आपल्या शितल छायेने दिलासा द्यायचा. त्यांची सुखदुःख ऐकून घ्यायचा आणि गुजगोष्टी करुन त्यांना दिलासा द्यायचा म्हणून तर तो लहानपणापासून आबालवृद्धांना आपला वाटायचा. वास्तविक लहानपणी त्याची महती कळण्याचे ते वय नव्हते. मधल्या काळात शिक्षणामुळे माझा आणि काजळवडाचा दूरावा निर्माण झाला होता. परंतु याच परिसरात जायगांवला नोकरी मिळाल्याने औंधशी पुन्हा नव्याने नाते जोडले गेले. खरे तर याचा आनंद माझ्या पेक्षा माझा सखा बनून राहिलेल्या माझ्या मित्रालाच अधिक झाला. या भागतून जाता येता त्याचे दर्शन व्हायचे. मूळपीठ डोंगरावर फिरायला गेलो तरी पायथ्याशी उभा राहून मान उंच करून तो माझी ख्याली खुशाली विचारायचा. हातात लेखनी आल्यावर औंधच्या पोटात जाऊन औंधनगरीची माहिती मिळवून लिहीत गेलो. तेव्हा मला खऱ्या अर्थाने या काजळवडाची महती कळली. कित्येक शतकापासून हा महाकाय वटवृक्ष अगदी आपल्या अगळपगळ फांद्या आजूबाजूला पसरुन अगदी बिनधास्तपणे विस्तारत उभा आहे. उन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता तो निर्धाराने सकाळच्या कोवळ्या उन्हाचा चटका जगतजननी श्रीयमाईदेवीला बसू नये म्हणून सकाळीच्या प्रहरी आपली सावली लांब करून देवीला छाया देण्यासाठी जणू त्याचा आटापिटा सुरू असतो.

तसे पाहिले तर औंध-गणेशवाडी राज्यमार्गाच्या दुतर्फा कडूलिंब, वडाची अनेक झाडे आहेत. या राज्यमार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारक आणि वाटसरुनां ती शितल छाया देतात. रस्त्यावर दुतर्फा झाडे असली तरी देखील मूळपीठ डोंगरावरील श्रीयमाईदेवीच्या मंदिराच्या अगदी समोर म्हणजे पायथ्याशी वडाचे एक विशाल झाड आहे. राज्यमार्गावरील सर्व झाडापैकी केवळ या वटवृक्षालाच अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विश्वात देखील त्याची ख्याती आहे. आपल्या कर्तुत्वाने या झाडाला वेगळे अधिष्ठान प्राप्त झाले आहे. औंध ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील लोक या वटवृक्षाला "काजळवड" या नावाने ओळखतात. सगळ्या झाडापैकी फक्त याच झाडाला स्वतः ची स्वतंत्र ओळख आणि नाव आहे. धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रात त्याला मान आहे.

गेली कित्येक दशके औंधमधील धार्मिक ऐतिहासिक कार्यक्रम तो दिमाखाने उत्साहाने सहभागी होत आला आहे. अनेक घटनांचा तो साक्षीदार आहे.त्याच्या सावलीत बसून डोंगरावर जाण्यापूर्वी मूळपीठ निवासिनी श्रीयमाईदेवीने आपल्या डोळ्यात काजळ घातले होते अशी अख्यायिका सांगितली जाते यावरून त्याला "काजळवड" हे नाव देखील प्राप्त झाले आहे. दसऱ्याला ऐतिहासिक पालखित बसून ग्रामनिवासिनी श्रीयमाईदेवी त्याच्या भेटीला येते. पायथ्याशी असलेल्या आपट्याच्या पानाची रास जणू त्याच्या पायावर रचली जाते पंतप्रतिनिधी घराण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत सरदार आपट्याच्या पानाला समशेर लावतात आणि तीच आपट्याची पाने उपस्थित हजारो भाविक सोने म्हणून पालखीवर उधळतात असे कितीतरी आनंदी क्षण त्याने अनुभवले आहेत. डबे लावून होणाऱ्या गोळीबाराचे आवाज कानात साठवले आहेत. कितीतरी सुखद आठवणी त्याच्या जवळ आहेत. त्याच्या बुंध्याशी बसून अनेकांनी केलेल्या सुखःदुखाच्या आनंदाच्या गोष्टी तो निमुटपणे आपलेपणाने ऐकून घेतो. याशिवाय परीसरात होणाऱ्या वाईट घटना डोळ्यात साठवून तो निमुटपणे पहात असतो. आपल्या अगळ पगळ आणि विशाल फांद्यांवरुन त्याच्या अंगाखांद्यावर लहानापासून मोठ्या पर्यंत किती जण नाचले उड्या मारल्या तरी हा कधीच कुणावर रुसला नाही कि फुगला नाही कुणाला उतला नाही का मातला नाही. हिरव्या लुसलुशीत पाल्यासाठी काहीजणांनी निर्दयपणे त्याच्यावर कुर्हाड देखील चालवली मात्र त्याने ते घाव निमुटपणे सोसून अव्याहतपणे अनेकांना सावलीच देत राहिला.

या मार्गावरुन प्रवासी आणि वाटसरू प्रवास करताना काजळवडाच्या समोर आले कि काही क्षण थांबून वडाच्या समोर असलेल्या मूळपीठ डोंगरावरील देवीला मनोभावे नमस्कार करतात. त्यामुळे या काजळवडाशी सर्वांचीच मैत्री आहे जिव्हाळ्याचे नाते आहे. अलीकडे वय झाले आहे. थोडाफार त्रास झाला तरी कसलीही खळखळ तक्रार न करता तो निमुटपणे सोसून तो.परस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. वाढत्या वयानुसार विस्ताराच्या ओझ्याने तो वाकला असला तरी झुकला नाही. त्याला वातावरणाचा त्रास झाला की औंधकर आणि त्याच्या मित्रांना कळ येते आणि त्याच्या मदतीसाठी ते धावून येतात गेल्या वर्षी त्याचा पश्चिमेकडील काही भाग पडला होता. त्यामुळे हैराण झालेल्या युवकांनी त्याच्या पारंब्याला आधार देऊन त्याच्या जिर्णोध्दाराचा चंग बांधला होता. त्या मुळ्यांना आधार मिळाल्याने त्या जमिनीच्या दिशेने निघाल्यामुळे वाटले होते आता तो नव्या जोमाने उभा राहिल. आणि त्याच्या साठी झटणाऱ्या नवीन पिढीची सोबत करून आपल्या सेवेचे व्रत अव्याहतपणे सुरू ठेवील परंतु परवा त्याने अचानक कुणालाही न सांगता कोणाला ईजा त्रास न करता एक्झिट घेतली. तो उन्मळून पडल्याने सर्वानीच हळहळ व्यक्त केली. अगदी दुरचा संबंध असला तरी व्रुतपत्रांनी देखील त्याची महती सांगण्यासाठी जागा दिली.... पुढच्या काळात त्याच ठिकाणी आणि त्यांच्या आजुबाजुला अनेक वटवृक्ष उभे राहतीलही परंतु काजळवडाची सर त्यांना येईल का कुणासठाऊक

फिरोज मुलाणी पत्रकार 9860105785 / 9421120356
Previous Post Next Post