स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे साताऱ्यात निदर्शने

 स्थैर्य, सातारा, दि. ११ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वितरण कंपनीने ३०० युनिटच्या आतील वीज वापर असलेल्या जिल्ह्यातील सर्व घरगुती ग्राहकांची तीन महिन्यांची वीज बिले माफ करावीत, जिल्ह्यात सर्व तालुकानिहाय दुष्काळ जाहीर करावा, एफआरपी कायद्याचा भंग करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, राज्य प्रवक्ते अनिल पवार, तालुकाध्यक्ष धनंजय महामुलकर,  उपाध्यक्ष दादासाहेब यादव, देवानंद पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कोरोना काळातील घरगुती वीज बिले शासनाने माफ करावीत. जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय पर्जन्यमापकाची नोंद घेऊन सर्व तालुकानिहाय दुष्काळ जाहीर करण्यात यावा, २०१९ - २० च्या गळीत हंगामात थकीत ऊसबिले तातडीने द्यावीत, तसेच एफआरपी कायद्याचा भंग करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांंना ५० हजार रुपये अनुदान तातडीने द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. येत्या १७ ऑगस्टपासून किसनवीर कारखान्याच्या अध्यक्षांच्या घरासमोर सर्व नियम व अटी पाळून ऊसबिल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांंनी दिला. याप्रसंगी रमेश पिसाळ, नितीन यादव, बापू साळुंखे, प्रमोद जगदाळे, संजय जाधव, विजय चव्हाण, महादेव डोंगरे, दत्ता पाटील, रवींद्र घाडगे, प्रमोद घाडगे, दादासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

Previous Post Next Post