राज्यातील प्रिंट मीडियाला ठाकरे सरकारचा दिलासाअसोसिएशन स्मॉल अॅन्ड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाच्या प्रयत्नांना सकारात्मक यश : आप्पासाहेब पाटील


स्थैर्य, सांगली (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षापासून प्रिंट मीडिया अडचणीत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील दैनिक, साप्ताहिकांची जाहिरात दरवाढ करावी, यासाठी असोसिएशन स्मॉल अॅन्ड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाच्यावतीने सातत्याने राज्य शासनस्तरावर प्रयत्न केला जात होता. अखेर या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रांना दरवाढ व श्रेणीवाढ दिली असल्याची माहिती असोसिएशन स्मॉल अॅन्ड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी दिली आहे.


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, माहिती व जनसंपर्क खात्याच्या राज्यमंत्री ना. आदित्य तटकरे, माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे, त्याचबरोबर माहिती व जनसंपर्क विभागातील संचालक, उपसंचालक, पुस्तके व प्रकाशने विभागाचे अधिकारी यांना आभाराचे पत्र देऊन राज्यातील लघु-मध्यम वृत्तपत्रांना दिलासा दिल्याबद्दल असोसिएशन स्मॉल अॅन्ड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाच्या वतीने धन्यवाद देण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे, राज्य सचिव प्रवीण पाटील, राष्ट्रीय कौन्सिल सदस्य, संघटक गोरख तावरे, राष्ट्रीय कौन्सिल सदस्य, समन्वयक नेताजी मेश्राम, राज्य प्रसिध्दीप्रमुख रंगराव शिंपूकडे यांच्या पत्रावर स्वाक्षरी आहेत.


महाराष्ट्र शासनाच्या मान्यताप्राप्त यादीवरील 833 वृत्तपत्रांना जाहिरात दरवाढ व श्रेणीवाढ देऊन दिलासा दिला आहे. दरम्यान 44 वृत्तपत्र शासनमान्य यादीवरून कमी करण्यात आली आहेत. कारण सदरची वृत्तपत्रे प्रसिद्ध होत नसल्यामुळे, आणि अनियमित आहेत अशा वर्तमानपत्रांना शासनमान्य यादीतून वगळण्यात आले आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने 13 ऑगस्ट 2020 रोजी शासन आदेश पारित करून ज्या वृत्तपत्रांना दरवाढ दिली आहे. आणि ज्या वृत्तपत्रांना श्रेणीवाढ दिली आहे. त्यांचा उल्लेखित सदर आदेशांमध्ये करण्यात आलेला आहे.


शासकीय संदेश प्रसार नियमावली – 2018 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्रातील वृत्तपत्रांची तपासणी करण्यात आली होती. नवीन नियमावलीनुसार जे वर्तमानपत्र पात्र आहेत. अशा महाराष्ट्रातील दैनिक, साप्ताहिकांसह लघु व मध्यम वृत्तपत्रांनाही दरवाढ, श्रेणीवाढ देण्यात आलेली आहे. ठाकरे सरकारने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे. महाराष्ट्रातील प्रिंट मीडियासाठी असोसिएशन स्मॉल अॅन्ड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडिया ही संघटना सातत्याने वृत्तपत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करीत असल्याने अखेर या प्रयत्नांना सकारात्मक यश आल्यामुळे अनेक संपादकांनी आनंद व्यक्त केला आहे.असे असोसिएशन स्मॉल अॅन्ड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी सांगितले.


सध्या प्रिंट मीडिया संक्रमणावस्थेतून जात असून प्रिंट मीडियाला या निर्णयामुळे उर्जितावस्था प्राप्त होईल, असा आशावादही आप्पासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील सर्वच वृत्तपत्रांची जाहिरात दरवाढ झाल्याबद्दल या जाहिरात दरवाढीमुळे लघु व मध्यम वृत्तपत्रांना दिलासा मिळाला असून येणाऱ्या काळांमध्ये वृत्तपत्र टिकवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सहकार्य लाभेल असा विश्वासही आप्पासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे.