एका शिवसैनिकाच्या धडपडीने संपूर्ण वसाहतीचा कायापालट

 


स्थैर्य, खटाव, (डॉ विनोद खाडे), दि. २५ : असं म्हणतात,"जर एखाद्या गावाला माणुसकीचा अभ्यास असणारा सरपंच लाभला तर संपूर्ण गावाचा सर्वांगीण विकास होवू शकतो, आणि त्याच गावात जर एखादा चिकाटीचा कार्यकर्ता असला तर त्याच्या राहत्या वसाहतीचा ही कायापालट करू शकतो असंच काहीसं खटाव तालुक्यातील कातर खटाव गावाच्या बाबतीत झालंय. स्वतःच्या खिशातून गावातील विकास कामासाठी खर्च करणारा सरपंच, "आपला माणूस, कामाचा माणूस" तानाजीशेठ बागल मग ते गावाला पिण्याच्या पाण्यासाठी स्वतःच्या पैशातून बोअरवेल असो, त्यावरील वीज पंप असो, किंवा गावातील अनेक वर्षांपासून रखडलेले पाणंद रस्ते असो, सगळ्या कामात आघाडी. अशा सरपंचाच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता पण शिवसैनिक संतोष दुबळे, शिवसेना विभागप्रमुख असलेल्या संतोष भाऊ दुबळे यांच्या अथक प्रयत्नाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर कातरखटाव या नगरचा कायापालट झालेला बघायला मिळत आहे. दुबळे यांनी दिवस रात्र एक करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगरमध्ये बऱ्याच वर्षापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या दलित समाजाला सोय करून दिली आहे.


या समाजातील माता भगिनी पाण्यासाठी वणवण भटकत होत्या हि गोष्ट संतोष दुबळे यांच्या मनाला पटत नव्हती, त्यांनी दिवस रात्र एक करून दलितसुधार योजनेतुन शासन दरबारी अथक प्रयत्नाने दलित समाज बांधवांना, माता भगिनींना पाणी मिळवून दिले, तसेच दलित समाज मधला तरुण व्यसनाधीन होवु नये म्हणुन तरूण मुलांसाठी व्यायाम शाळा मंजुर करून आणली, दलित समाज अंतर्गत रस्त्यापासून वंचित होता त्यांना रस्ता मंजुर करून आणला, बरायच दिवसांपासून समाजात गटार नव्हते, त्यांनी गटरे मंजुर करून आणली, जागोजागी साफसफाई करून घेतली तसेच समाज एकोप्याने कटिबद्ध राहण्यासाठी एक स्मारक उभे केले, तसेच श्री साईबाबा मंदिर ही दिमाखात उभे केले. अशा या सामाजिक कामात कडव्या असलेल्या संतोष भाऊ दुबळे या शिवसैनिकाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.