खुनाच्या गुन्हयातील फरारी आरोपीच्या स्थानिक गुन्हा शाखेने आवळल्या मुसक्या

 स्थर्य, सातारा, दि. २१ : कोरेगाव तालुक्यातील दरे गावच्या हद्दीत माळरानावरील पारधी वस्तीवर विजय सावता काळे यांचा नऊ जणांनी निर्घुण खुन केला होता. यापैकी दोन संशयीतांना कोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले परंतु, मुख्य सुत्रधारासह इतर संशयीत पसार झाले होते. दि. 20 रोजी आसगाव, ता. सातारा येथील टेकडीवर एलसीबीच्या पथकाने मुख्य संशयीताचा थरारक पाठलाग करून त्यास जेरबंद केले.


याबाबत माहिती अशी, दरे गावचे हद्दीत माळावर राहण्यास असणार्‍या पारधी वस्तीवर पुर्ववैमनस्यातून नऊ जणांनी मिळून विजय सावता काळे यांचा निर्घुण खून केला होता. त्यापैकी दोन संशयीतांना कोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु, मुख्य संशयीत व इतर आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार झाले होते. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपूते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला उर्वरित संशयीतांना अटक करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार एलसीबी पथक संशयीतांच्या मागावर होते. दि. 20 रोजी एलसीबीचे पोनि सर्जेराव पाटील यांना खुनातील मुख्य संशयीत आसगाव, ता. सातारा परिसरात नातेवाईकांना भेटण्याकरिता येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक आसगाव परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना मुख्य संशयीत आसगावच्या बाहेर टेकडीवर असलेल्या पारधी वस्तीवर असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानंतर पथक पारधी वस्ती असलेल्या टेकडीवर चढून जात होते. यावेळी पोलीसांची चाहूल लागताच संशयीत पळून जावू लागला. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थरारक पाठलाग करून त्यास जेरबंद केले.


या गुन्ह्याच्या पुढील तपास कोरेगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपूते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या सुचना व मार्गदशनाखाली स.फौ. पृथ्वीराज घोरपडे, स. फौ. ज्योतीराम बर्गे, पो. हवा. सुधीर बनकर, मुबीन मुलाणी, पो. ना. शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, विक्रम पिसाळ, विशाल पवार, केतन शिंदे व चालक विजय सावंत यांनी केली.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya