कवयित्री बहिणाबाईंच्या स्मारकासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करणार

 


स्थैर्य, जळगाव, दि. 24 : कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या जन्मभूमीचा (आसोदा) मी जनसेवक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. बहिणाबाई या समाजाला प्रेरणादायी आहेत. त्यांनी कवितेच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे काम केले. त्या खर्‍या अर्थाने समाजसुधारक होत्या. असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.


कवयित्री बहिणाबाईंच्या जयंतीनिमित्त आसोदा येथील बहिणाबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर पालकमंत्री उपस्थितांशी बोलत होते.


पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले, बोली भाषेतील बहिणाबाईंच्या कविता, गाणी सर्वव्यापी व सर्वस्पर्शी आहेत. निसर्ग, शेतकरी, शेती, स्त्रियांच्या व्यथा, विनोद, अध्यात्म अशा सर्व विषयांना त्यांनी कवितेतून जगासमोर मांडले. बहिणाबाई या समाजाला प्रेरणादायी आहेत. त्यांनी कवितेच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे काम केले. त्या खर्‍या अर्थाने समाज सुधारक होत्या. असेही पालकमंत्री यांनी आवर्जून सांगितले.


बहिणाबाईंची जन्मभूमी असणारे आसोदा हे गाव माझ्या मतदारसंघात असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. पालकमंत्री झाल्यानंतर बहिणाबाईंच्या स्मारकाच्या कामाला गती देणार तोच कोरोनाची आपत्ती आली. असे असले तरी आपण बहिणाबाईंच्या स्मारकासाठी लवकरच दोन कोटी रूपयांची तरतूद करणार असून हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली. आसोदेकरांना आपण जी जी कामे करण्याचे आश्वासन दिले होते.त्यापैकी अनेक कामे पूर्ण झाली असून काही कामे सुरू आहेत. गावासाठी आपण नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी कटिबद्ध असून योजना लवकरच पूर्ण होणार असल्याची ग्वाहीही ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर भादली गावाकडे जाणार्‍या चौकातील वाढीव काम करण्याच्या सूचनाही त्यांनी कंत्रादाराला दिल्या.


या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच श्रीमती नबाबाई बिर्‍हाडे, तुषार महाजन, बहिणाबाई स्मारक समिती अध्यक्ष किशोर चौधरी, उपाध्यक्ष प्रदीप भोळे, सदस्य संजीव पाटील, योगेश वाणी, रविकांत चौधरी, ग्रा. पं. सदस्य अनिल महाजन, संजय भोळे, खेमचंद महाजन, संजय बिर्‍हाडे, सुभाष महाजन,सचिन चौधरी, रमाकांत कदम, उमेश बाविस्कर,जितेंद्र भोळे तसेच बहिणाबाई महिला मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या.