अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीमध्येच; पाकिस्तानने दिली कबुली
स्थैर्य, दि. २३ : पाकिस्तान सरकारने देशातल्या 88 कट्टरतावादी नेते आणि संघटनांवर शनिवारी (22 ऑगस्ट) निर्बंध लादले. या यादीत दाऊद इब्राहिमचा समावेश केला आहे.


त्यामुळे पाकिस्तान सरकारनं पहिल्यांदाच अप्रत्यक्षपणे का होईना दाऊद आपल्याच देशात असल्याचं स्वीकारलं आहे.


पाकिस्तान सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीमध्ये डॉन दाऊद इब्राहिमचाही समावेश आहे. त्याचा कराचीचा पत्ता या यादीत नमूद करण्यात आलाय. पीटीआयने याविषयीचं वृत्त दिलंय.


1993च्या बॉम्बस्फोटांपासून दाऊद इब्राहिम भारतासाठी 'मोस्ट वाँटेड डॉन' आहे.


या यादीतल्या 88 कट्टरतावादी संघटना आणि नेत्यांवर पाकिस्तान सरकारने कडक आर्थिक निर्बंध लावल्याचं जाहीर केलंय. दाऊद इब्राहिमसोबतच जमात-उद्-दावा संघटना आणि हाफिज सईद, जैश - ए - मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर, तालिबान, दाएश, हक्कानी ग्रूप, अल्-कायदा आणि इतरांचा समावेश आहे. या संघटना आणि नेत्यांची मालमत्ता जप्त करण्यात येणार असून त्यांची बँक खातीही गोठवण्यात येणार आहेत.


पॅरिसमधल्या फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) ने जून 2018मध्ये पाकिस्तानचा समावेश 'ग्रे लिस्ट' मध्ये केला होता. हा गट जगभरातल्या देशांमधली पैशांची अफरातफर - मनी लाँडरिंग, दहशतवादी गटांना होणारा वित्तपुरवठा यावर लक्ष ठेवतो. G-7 शिखर परिषदेत या गटाची स्थापना करण्यात आली होती.


ज्या देशांचा समावेश ग्रे लिस्टमध्ये होतो त्यांच्यावर हा गट अधिक लक्ष ठेवतो आणि अशा देशांना उपाययोजना कराव्या लागतात. एखादा देश ग्रे लिस्टमध्ये आल्यास त्याचा परिणाम IMF आणि वर्ल्ड बँककडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर आणि इतर देशांसोबतच्या व्यापार संबंधांवर होऊ शकतो.


2019 वर्षाच्या अखेरपर्यंत पाकिस्तानने उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असं फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने सांगितलं होतं पण त्यानंतर कोव्हिड 19च्या साथीमुळे पाकिस्ताननला मुदतवाढ देण्यात आली.


या यादीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न म्हणून पाकिस्तानने या 88 गटांवर आणि त्यांच्या नेत्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत.


दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा करण्यात आला होता. पण पाकिस्तानने हे आरोप फेटाळून लावले होते.


आता पहिल्यांदाच दाऊद पाकिस्तानात असल्याचं पाकिस्तान सरकारने मान्य केल्याचं स्पष्ट होतंय. पाकिस्तान सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेल्या यादीत दाऊद इब्राहिमचा कराचीतला पत्ता 'व्हाईट हाऊस, सौदी मशिदीजवळ, क्लिफ्टन' असा देण्यात आलाय.Previous Post Next Post