अनावश्यक ई-पास


स्थैर्य. फलटण : चिन मधील वूहान प्रांतात उगम पावलेल्या ‘कोरोना’ विषाणूचा उद्रेक 9 मार्च 2020 रोजी आपल्या महाराष्ट्रात सुरु झाला. आजमितीस संपूर्ण भारत देशात महाराष्ट्र हे कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेले राज्य आहे. अर्थातच कोणतेही औषध उपबल्ध नसलेल्या व वेगाने फैलावणार्‍या या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी मार्च महिन्यापासून राज्यशासनाकडून जनतेवर अनेक निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे याचा दूरगामी परिणाम जनजीवनावर झाला आहे. 

29 जानेवारी 2020 रोजी भारतातील पहिला रुग्ण हा केरळमध्ये आढळला. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण पुण्यामध्ये 9 मार्च 2020 रोजी आढळून आला. महाराष्ट्रातील पहिला बळी 16 मार्च 2020 रोजी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला. याच दरम्यान जगभरातील विविध देशांमध्येही कोरोना मोठ्या प्रमाणावर विस्तारत होता. इटली, अमेरिका या देशांमधील भयावह परिस्थिती माध्यमांकडून वारंवार दाखवली जात होती. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अथवा नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने लोकांच्या प्रवासावर मोठे निर्बंध घालण्यात आले. 11 मार्च 2020पासून राज्यातील प्रवासी वाहतूक करणार्‍या सर्व बससेवा अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आल्या. 22 मार्च पासून प्रवासी वाहतूक करणार्‍या सर्व आंतरराष्ट्रीय विमान सेवा, रेल्वे तसेच मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आल्या. राज्याच्या सर्व सीमा सील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्याही सीमा सील करून एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात वाहतूक करण्यास त्यानुसार मनाई करण्यात आली. अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांना घरी बसणे सक्तीचे करण्यात आले. 


एकीकडे या सर्व निर्बंधांची सक्ती सुरु असताना दुसरीकडे मात्र कोरोनाचा फैलाव सुरुच होता. मात्र तो केवळ मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठमोठ्या शहरांमध्ये होता; राज्यातील विविध जिल्ह्यातील बहुतांश निमशहरी व ग्रामीण भाग कोरोनापासून सुरक्षित होता. दरम्यानच्या या लॉकडाऊनच्या काळात सरकारकडून  विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना घरी जाता यावे यासाठी ‘ई-पास’; अर्थात प्रवासाचा परवाना काढून प्रवास करण्याची मूभा नागरिकांना देण्यात आली. यामुळे अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांना आपापल्या घरी जाण्याची सोय झाली; मात्र त्याचा दुसरा दुष्परिणाम असा झाला की, ग्रामीण भागातून कामानिमित्त कायमस्वरुपी मोठ-मोठ्या शहरात वास्तव्यास गेलेली अनेक कुटूंबे या ई - पास द्वारे आपापल्या घरी माघारी परतू लागली आणि यातील अनेक जणांनी आपल्या सोबत ‘कोरोना’ विषाणूलाही आणले. त्यातून सुरुवातीच्या काळात सुरक्षित राहिलेली अनेक निमशहरे, ग्रामीण भाग कोरोनाचा हॉटस्पॉट व्हायला सुरुवात झाली. मुंबई, पुणे सारख्या बाधीत भागातून प्रवास करुन आलेले अनेकजण गावी आल्यानंतर कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले. म्हणजेच ‘ई-पास’ कोरोनाला एकप्रकारे निमंत्रणच ठरला. असो, हा झाला भूतकाळ.


आता वर्तमानस्थितीचा विचार केला तर संपूर्ण देशात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. याचाच भाग म्हणून केंद्र सरकारने नुकतेच राज्याला एका पत्राद्वारे ई-पास ची यंत्रणा बंद करण्याचे सूचित केले आहे. मात्र राज्यसरकार अजूनही ई-पास सक्तीवरच ठाम आहे. एकीकडे राज्यात ‘पुनश्‍च हरिओम’ ची घोषणा देवून लॉकडॉऊनमुळे बंद झालेले व्यवसाय, उद्योग धंदे सुरु करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. तर दुसरीकडे प्रवासासाठी निर्बंध कायम ठेवले जात आहेत. हे अतिशय विसंगत आहे. यामुळे अनेकांच्या कामकाजावर बंधने येत आहेत. शिवाय, यातील सर्वात मोठी गंमतीची बाब म्हणजे; नुकत्याच झालेल्या राज्यशासनाच्या निर्णयानुसार शासनाने अंतरजिल्हा एस.टी. बस सेवा सुरु केली आहे आणि या सेवेद्वारे प्रवास करताना ई-पासची अट ठेवलेली नाही. म्हणजे तुम्ही विना ई-पास एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात एस.टी. बस द्वारे प्रवास करु शकता. पण जर तुम्हाला तुमच्या खाजगी वाहनाने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला ई - पास अजूनही सक्तीचा आहे. म्हणजे, ‘जर एस.टी.ने प्रवास केला तर कोरोनाचा फैलाव होणार नाही’ अशी जर कुणी सरकारच्या या निर्णयाची टिंगल केली तर त्यात गैर काहीच नाही. 


एकूणच या ई-पास चा भूतकाळ आणि वर्तमानकाळ दोन्ही तपासले तर याला अनावश्यक यासाठी म्हणता येईल, जेव्हा आवश्यकता नव्हती त्यावेळी ही यंत्रणा सुरु करण्यात आली आणि आता ही यंत्रणा थांबवण्याची गरज असताना ती अजूनही हट्टाने राबवली जात आहे. 


शेवटचा मुद्दा -

आजही ई-पास जरी सक्तीचा असला तरी अनेक जिल्ह्यांच्या सिमांवर वाहनांना विना तपासणी प्रवेश सहजतेने करता येत आहे. तर काही ठिकाणी थोडीशी वाट वाकडी करुन छोट्या - छोट्या गावांतून प्रवास करुन जिल्हा बंदीच्या निर्बंधातून लोक सटकत आहेत. त्यामुळे राज्यशासनाने ई-पास चा अनाठायी हट्ट थांबवावा, असेच सर्वसामान्यांचे मत आहे.


- रोहित वाकडे, 

संपादक, सा. लोकजागर, 

फलटण.