ब्रिटिश कालीन म्हसवड -राजेवाडी तलावाची पाणी पातळी २३ फुटावरस्थैर्य, म्हसवड दि.२४ (महेश कांबळे) : माण तालुक्यात यंदा मान्सुनच्या पहिल्याच सत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्याने माणमधील सर्व बंधारे, ओढे, छोटे तलाव पुर्णपणे भरले असुन माणची जिवनसंगिणी असलेली माणगंगा नदी ही पहिल्याच सत्रात भरुन वाहु लागल्याने या नदीचे पाणी ज्या म्हसवड ( राजेवाडी) तलावाला मिळते त्या तलावाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे.


सलग दुसऱ्या वर्षी वरुण राजाच्या कृपेने म्हसवड ( राजेवाडी ) तलावात पाऊसाचे पाणी दाखल झाले आहे पाऊसाने सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात दमदार हजेरी लावली त्यामुळे  माण तालुक्यातील माण नदीस पाणी आले यामुळे सध्या राजेवाडी तलावात पाण्याच्या पातळीत २० फुटाने वाढ झाली आहे, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. माण तालुक्यात पाऊसाने दमदार हजेरी लावली यामुळे म्हसवड येथील माण नदीला पाणी आले या पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे ते पाणी राजेवाडी तलावात साठू लागले आहे गेल्या वर्षी दिघंची सह  माण तालुक्यात  परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली होती  व त्यामुळे येथील ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता  व सांडव्यावरून पाणी वाहत होते.   या तलावातील अगोदरचा काही प्रमाणात पाणीसाठा शिल्लक होता व आता झालेल्या पावसामुळे या राजेवाडी तलावातील पाणी साठा वाढण्यास गती आली आहे.


राजेवाडी तलावाची साठवण क्षमता 3 टी एम सि इतकी आहे मात्र साठवण क्षेत्र सातारा जिल्ह्यात आणि तलावाची सांड सांगली जिल्ह्यात आहे.आणि या तलावाच्या लाभ क्षेत्रात सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावे येतात.परंतु गेली अनेक वर्षांपासून कमी पर्जन्यमाना मुळे राजेवाडी तलाव कोरडा ठणठणीत पडला होता. त्यानंतर अनेक राजकीय पक्ष व राजकीय नेत्यांनी उरमोडी व जिहे कटापूर या योजनांमधून पाण्याबाबत घोषणा केल्या पण प्रत्यक्षात अजून म्हसवड (राजेवाडी ) तलावात पाणी आले नाही. म्हसवड (राजेवाडी )तलावात पाणी आणण्याबाबत उपाययोजना झाल्या परंतु त्या अपुऱ्या पडल्या. जिहे कटापूर योजनेसाठी माणचे आ. जयकुमार गोरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक शिलेदारांनी पाठपुरावा केला आहे, त्यामुळे  जिहे काठापुर योजनेला केंद्र शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. त्याचे काम पण युद्धपातळीवर सुरू आहे.


यापूर्वी २००८ च्या दरम्यान देखील माणगंगा नदीच्या उगम परिसरात जोरदार पाऊस झाल्याने राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते.परंतु त्यानंतर तब्बल १० वर्षांनी म्हणजे गत वर्षी  राजेवाडी तलाव पूर्ण  पूर्ण क्षमतेने भरला होता यंदा तर या परिसरात  पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे यंदाच्या वरूणराजाच्या कृपेने म्हसवड (राजेवाडी ) तलावात लवकर पाणी दाखल झाल्याने शेतकऱ्यांचा आंनद द्विगुणित झाला आहे या तलावाच्या सांडव्या वरून पाणी पडण्यास आणखी ६ फूट शिल्लक आहेत या परिसरात आणखी पाऊस झाल्यास लवकरच यंदाच्या वर्षीही म्हसवड (राजेवाडी ) तलाव पूर्ण क्षमतेने भरेल अशी आशा येथील शेतकऱ्यांना आहे त्यामुळे परिसरातील दिघंची, राजेवाडी, लिंगीवरे, पुजारवाडी (दि) व सांगोला तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.


राजेवाडी तलावात पाणी आले असले तरी तलाव पात्रात खुप मोठ्या प्रमाणात चिल्लारीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, याकडे संबंधित पाटबंधारे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. तसेच तलावात पाणी जसजसे साठेल तसतसे मोठ्या प्रमाणात त्याचा बेकायदेशीर उपसा होऊ लागला आहे तो होणारा उपसा बंद करणे गरजेचे आहे. आटपाडी तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावे वाड्या वस्त्या गेली अनेक वर्षांपासून दुष्काळाचे चटके सोसत आहे मात्र म्हसवड (राजेवाडी ) तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहिल्या शिवाय येथील माण नदी, ओढा नाले यांना पूर आल्याशिवाय खऱ्या अर्थाने इथला दुष्काळ संपत नाही. त्यामुळे या तलावात कायम स्वरूपी पाणी आणण्यासाठी जिहे - कटापूर व उरमोडीचे पाणी येणे गरजेचे आहे यासाठी अनेक वर्षापासून येथील शेतकरी मागणी करीत आहेत.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya