वैयक्तिक वादातून मलकापूर येथे पत्नीचा खून : पती ताब्यात
स्थैर्य, कराड, दि. 30 : मलकापूर येथील शिवाजी चौक परिसरात सौ. मंगल दाजी येडगे (वय 48) या महिलेचा रविवारी पहाटे 5 ते 6  च्या सुमारास खून झाल्याची घटना घडली. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून वैयक्तिक वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा खून तिच्या पतीनेच केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यामुळे चौकशीसाठी पती दाजी आनंदा येडगे यास कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मयत विवाहितेचा भाऊ विलास सोनके यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती व मंगलचे भाऊ विलास सोनके (वय 60), रा. प्रेमलाताई चव्हाण कन्याशाळा परिसर, लक्ष्मीनगर, मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अधिक माहिती अशी, मलकापूूर, ता. कराड येथे मुख्य रस्त्यालगत शिवाजी चौक परिसरात दाजी येडगे पत्नी मंगल व मुलगा अनिकेत असे कुटुंब वास्तव्यास आहे. दाजी येडगे व मंगल येडगे यांच्यात घरगुती कारणांमुळे वारंवार भांडणे होतात हे अनिकेतने त्यांना सांगितले होते. चार दिवसांपूर्वीच दोघांनाही समजावून सोनके यांनी सांगितले होते. तरीही रविवारी पहाटे 5 च्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणात मंगल यांना मारहाण केली असावी. त्यातच डोक्याला जबर मार लागल्यामुळे जागीच ठार झाल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, हे कृत्य आपणच केल्याची कबुली आसपासच्या काही नागरिकांजवळ पती दाजी येडगे यांनी दिल्याची घटनास्थळी चर्चा होती आणि विलास सोनके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पत्नीचा खून केल्या प्रकरणी पोलिसांनी पती दाजी येडगे यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती नागरिकांकडून मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्यासह पोलीस निरीक्षक सराटे, पोलीस हवालदार पन्हाळे, पोलीस हवालदार बर्गे दाखल झाले होते. पोलिसांनी येडगे यांच्या घरात जावून पाहिले असता मंगल येडगे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.


मलकापूर शहरात कोरोनाचा कहर सुरू असतानाच शहरातील मुख्य रस्त्यालगत भरवस्तीत घडलेल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. खून झालेल्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती.

 


Previous Post Next Post