करोनामुळे हुतात्मा झालेल्या पोलिसांच्या वारसांना पन्नास लाखांचा धनादेश

 

स्थैर्य, सातारा, दि.१२: करोनाच्या संकटात जनतेच्या रक्षणासाठी जीवतोड मेहनत घेणाऱ्या पोलिसांवर गेले सहा महिने कामाचा प्रचंड ताण आहे. या काळात अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. या लढाईत हुतात्मा झालेल्या पोलिसांच्या वारसांना पन्नास लाखांचे सानुग्रह अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले होते.

त्यानुसार करोनामुळे मृत्युमुखी सातारा जिल्हा पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते प्रत्येकी पन्नास लाखांचे धनादेश शुक्रवारी देण्यात आले. पोलिसांना केव्हाही अडचण आली तरी हाक मारा, अशी भावनिक साद सातपुते यांनी घातली.

करोनाविरुद्धच्या युद्धात काम करणाऱ्या डॉक्‍टर व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्याच धर्तीवर पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर मृत्यू झाल्यास 50 लाख रुपये त्यांच्या वारसांना देण्याचा निर्णय 3 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य सरकारने घेतला होता.

सातारा जिल्ह्यातील पोलीस दल करोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करून गेले सहा महिने योगदान देत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावणेतीनशे पोलिसांना करोनाची बाधा झाली असून त्यातील अनेकांनी त्यावर मात केली आहे. अनेक जणांवर उपचार सुरू आहेत. वाई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार गजानन हणमंत ननावरे यांना जुलै महिन्यात करोनाची बाधा झाली होती.

प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. रहिमतपूर पोलीस ठाण्यात हवालदार आनंद गजानन गोसावी यांना ऑगस्ट महिन्यात करोनाची बाधा झाली होती.

त्यांच्यावर साताऱ्यात उपचार सुरू होते; परंतु त्यांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांमुळे पोलीस दल हादरून गेले होते. त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था बिकट झाली होती. या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर वारसांना शासनाकडून दिले जाणारे 50 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तेजस्वी सातपुते यांनी सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मिळवून दिले.

राज्य सरकार व जिल्हा पोलीस दलाने जगण्यासाठी आधार दिल्याबद्दल त्यांचे हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबीयांनी आभार मानले.

त्या कुटुंबिंयांच्या सोबत राहू 

करोनाच्या लढाईत पोलीस दल गेली सहा महिने काम करत आहे. माझ्या पोलिसांना करोनाची बाधा होऊ नये म्हणून त्यांना औषधे, मास्क, पल्सऑक्‍सिमीटर, थर्मामीटर दिले आहेत. पुरेशी खबरदारी घेऊनही दुर्दैवाने अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे; परंतु त्यांनी घाबरून जाऊ नये. संपूर्ण पोलीस दल त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. हुतात्मा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कसलीही अडचण आली तरी त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. त्यांना एकटेपणा जाणवू दिला जाणार नाही, असे सातपुते यांनी सांगितले.
Previous Post Next Post