मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमटविलेल्याज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (वय ७९) यांचे आज पहाटे चार वाजता कोविड न्यूमोनियामुळे निधन झाले.स्थैर्य, दि.२२: साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमधील कोविड अतिदक्षता विभागात त्या पाच दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या, परंतु अतिगंभीर संसर्गामुळे त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. संजय साठे आणि हृदय विकार तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी दिली.

एका वाहिनीवर काळूबाई मालिका सुरु आहे. या मालिकेचे चित्रिकरण सातारा जिल्ह्यात हिंगणगाव येथे सुरु होते. चित्रिकरणादरम्यान मुंबईतील काही नर्तक कलाकार एक दिवस सहभागी झाले होते.

त्यावेळी मालिकेतील काही कलाकारांना करोनाची लागण झाली होती. त्यामध्ये आशालता यांचाही समावेश होता. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने येथील प्रतिभा हाँस्पिटलमध्ये त्यांना पाच दिवसा पूर्वी दाखल केले होते. तीव्र संसर्गामुळे त्यांचा उपचारास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही . मात्र मंगळवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला . जिल्हा प्रशासनाने चित्रिकरणाचा संपूर्ण परिसर प्रतिबंधित करून बाधित रुग्णांना उपचारासाठी इतरत्र हलविण्यात आले आहे . अभिनेत्री अलका कुबल यांचा स्वॅब टेस्ट रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आल्याची माहिती आहे .

आशालता यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या. मूळच्या गोवा येथील असणाऱ्या आशालता यांचा गोमंतक कोकणी व मराठी नाट्यसृष्टीशी घनिष्ट नाते होते . हिंदीतील ज्येष्ठ दिग्दर्शक बासु चटर्जी यांनी त्यांचे नाटकातील काम पाहून त्यांना अपने- पराएँ या हिंदी चित्रपटात संधी दिली होती . मराठी हिंदी चित्रपटसृष्टी चित्रमालीका, नाटक अशी आशालता यांची चौफेर कामगिरी होती .आशालता वाबगावकर यांच्या आकस्मिक निधनाने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे .