आश्‍वासनानंतर आंदोलन मागे

 


स्थैर्य, वडूज, दि. 24 : शहरात दिवसेंदिवस वाढतच चाललेली कोरोना बाधितांची संख्या व अपुर्‍या पडणार्‍या सुविधा या पार्श्‍वभूमीवर वडूज नगरपंचायतीचे भाजप नगरसेवक अनिल माळी यांनी वडूज येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते.


खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरात एक जम्बो कोविड सेंटर उभारण्यात यावे. या सेंटरमध्ये तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नेमण्यात यावेत, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, औषधे या गोष्टी परिपूर्ण असाव्यात आदी मागण्यांसाठी अनिल माळी यांनी वडूज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. प्रशासनाच्या आश्‍वासनानंतर काही तासांतच आंदोलन मागे घेण्यात आले.


भाजप तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दिला. आ. जयकुमार गोरे यांनी या आंदोलनास भेट देवून अधिक माहिती घेतली व खटाव तहसीलदार अर्चना पाटील यांच्या बरोबर चर्चा केली. या चर्चेवेळी आंदोलकांसह वडूज नगरपंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर व इतर नगरसेवकांची उपस्थिती होती.


सुमारे अर्धा तास चाललेल्या या चर्चेमध्ये वरील सर्व मागण्या मान्य होऊन त्वरित अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासन तहसीलदारांनी दिल्यामुळे अनिल माळी यांनी हे धरणे आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले. अनिल माळी यांच्याबरोबर भाजप जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव खाडे, शहर अध्यक्ष प्रदीप शेटे, जयवंत पाटील, स्वीकृत नगरसेवक नीलेश गोडसे, डॉ. प्रशांत गोडसे, प्रा. अजय शेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya