पिरेवाडी येथील युवकाला खंडणी मागितल्याप्रकरणी फरार असलेल्या चारही वन कर्मचार्‍यांवर निंलबनाची कारवाई

 

स्थैर्य, सातारा दि.२४: पिरेवाडी येथील युवकाला खंडणी मागितल्याप्रकरणी फरार असलेल्या चारही वन कर्मचार्‍यांवर निंलबनाची कारवाई उपवनसरंक्षक यांनी केली आहे. 

उपवनसंरक्षक, सातारा वनविभागातील योगेश पुनाजी गावित, वनपाल, परळी, महेश साहेबराव सोनावले, वनरक्षक कुसवडे, रणजित व्यकंटराव काकडे वनरक्षक, पळसावडे व किशोर ज्ञानेदव ढाणे, वनरक्षक कार्या. दहिवडी सध्या कार्यरत ठोसेघर अशी संंबंधितांची नावे आहेत. 

दि. 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी शिवारातील पिकांचे माकडांपासून रक्षण करण्यासाठी गेलेल्या ओंकार शिंदे या युवकाला वनविभागाच्या चार कर्मचार्‍यांनी पकडून त्याला शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. यावेळी त्याला मारहाण करून त्याच्याकडून कोर्‍या कागदावर सह्या घेऊन हाताचे ठसेही घेतले.व त्याच्याकडे एक लाख रुपयांची मागणी करत त्याच्या कुटुंबियांकडून पंचवीस हजार रुपये उकळले होते. 5 सप्टेंबरला या घटनेची फिर्याद ओंकार शिंदे याने बोरगाव पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी वनपाल योगेश गावित, वनसंरक्षक महेश सोनवले, रणजित काकडे व किशोर ढाणे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हे चारही वनकर्मचारी पोलिसांना गुंगारा देत आहेत.

दरम्यान, याप्रकरणी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने वनक्षेत्रपाल सातारा यांच्याकडुन तसेच प्राथमिक चौकशी अधिकारी, सहा. वनसंरक्षक (वनिकरण व कॅम्प) सातारा यांच्याकडुन उपवनसंरक्षक (प्रा) सातारा यांच्याकडे प्राप्त चौकशी अहवालानुसार वरील चार कर्मचार्‍यांना दि. 24 सप्टेंबर 2020 पासून शासन सेवेतून निलंबित केले असल्याचे डॉ. भरतसिंह हाडा, उपवनसंरक्षक, सातारा वनविभाग, सातारा यांनी कळविले आहे.

सातार्‍यातील पश्‍चिम भाग हा डोंगराळ भाग आहे.येथे वनसंपदाही मोठ्या प्रमाणावर आहे. आशियाई महामार्गावर असलेल्या नागठाणे गावाच्या पश्‍चिमेलाही डोंगर असून येथे मोठी वनसंपदा आहे. याच डोंगरभागात पिरेवाडी सारखी अनेक छोटी गावे वसली आहेत. डोंगर भागातील साध्याभोळ्या माणसांच्या स्वभावाचा फायदा वनपाल योगेश गावित व वनसंरक्षक महेश सोनवले यांनी घेतला. यामुळे वनविभागाची लक्तरे मात्र टांगली गेली.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya