कै. अरविंद महादेव रानडे - प्रथम पुण्यस्मरण

 विझताना समई पहाट देऊन गेली ....!
कै. अरविंद महादेव रानडे (१०/१०/१९३९ -- १५/०९/२०१९)

स्थैर्य, फलटण, दि.१५: कै. अरविंद महादेव रानडे यांचा आज प्रथम स्मृतीदिन ! रानडेसाहेबांच्या नावामागे जोडण्यासाठी कांही विशेषणाचा विचार करावा तेंव्हा शब्दकोशातले सर्व स ने सुरू होणारे शब्द ओळीने डोळ्यासमोर सरकू लागतात. सुप्रसिध्द, सचोटी, सकारात्मकता, सुशील, सुसंस्कारी सुवचनी, सुस्वभाव, सुसंवादी, संवेदनशील, स्मितवदन.....अजून बरेच सारे शब्द , रानडेसाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करणारे ! गेलेल्या माणसाबद्दल चांगल्याच गोष्ट बोलाव्या, अशी एक प्रथा असते पण रानडेसाहेबांच्या बाबत चांगले गुण आठवावे लागत नाहीत तर त्यांच्या आठवणीने सर्व चांगल्या गुणांची, गोष्टींची आठवण होते. फलटण शहरावर अनेक वर्षे त्यांनी सत्सेवेची, सदाचाराची, सात्विकतेची पखरण केली आहे. त्यांची अधून मधुन होणारी आठवण देखील आजही सद्भाव निर्माण करून जाते. १९८१ साली मी फलटण शहराशी नोकरी निमित्ताने जोडला गेलो. नंतरच्या काळता फलटण शहरातील अनेक गोष्टी, व्यक्तींची ओळख होत गेली त्यामध्ये विशेषत्वाने बांधकाम व्यवसायात राहूनही रानडेसाहेबांचे नाव प्रथम उल्लेखापासून ते त्यांच्या अखेरपर्यंत आदर सन्मानाने घेतले गेले, हल्लीच्या काळात अशी माणसं अपवादानेच पहायला मिळतात ! 

साधेपणा हा रानडेसाहेबांचा सहज स्वभाव होता जो त्यांच्या व्यक्तिमत्वात विचासारणीत सतत जाणवत राहिला. रानडेसाहेबांनी फलटण शहरात बांधकाम व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात केलेले काम प्रचंड म्हणावे इतके आहे पण त्यांच्या वागण्या बोलण्यात त्याचा लवलेशही नसायचा. नंतरच्या काळात फलटण शहरातून ग्रामीण भागात आणि इतर जिल्ह्यात बदली झाल्याने त्यांच्या माझ्या भेटी कमी झाल्या पण जेंव्हा कधी ते कुठेही भर रस्त्यावर देखील भेटले की मी उत्स्फूर्तपणे त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करीत असे, तो स्वीकारतानाही त्यांनी कधीच कसलाही बडेजाव केला नाही की ‘कशाला कशाला’ सारखी नाटकेही केली नाहीत. उत्स्फूर्तपणे नतमस्तक व्हावे अशी माणसे आजच्या जगात किती मिळतात? त्यामुळेच रानडेसाहेबांसारखी माणसे गेली की आपले भावविश्व रिकामे झाल्याची जाणीव सदैव होत राह्ते. कर्तुत्ववान माणसे आपलं आत्मचरीत्र लिहतात पण रानडेसाहेबांनी आपल्या नंतरच्या पिढीला आपली ओळख व्हावी, राहावी या साध्या भावनेने आपला जीवन वृत्तान्त अगदी शेवटच्या काळात शब्द्बध्द करून ‘आठवणींच्या गुजगोष्टी’ नावाने पुस्तकरूपात छापला आहे. हे छापून होताच ते निघून ही गेले, त्यावरच्या उत्तम प्रतिक्रियाही ऐकायला ते थांबले नाहीत, त्यांच्या साधेपणाला ते अखेरपर्यंत जगले असंच म्हणावं लागेल. 

सुरवातीच्या काळात शासकीय बांधकामाच्या कामात नुकसान झाल्याने खाजगी कामे सुरू केली, त्यावेळी नकाशा काढून देण्याचे कुणी १० रुपये दिले तरी आनंद व्हायचा हे ज्या प्रांजळपणे रानडेसाहेब सांगतात त्याच साधेपणाने “कामाच्या दर्जाची श्रेणी नेहमी उच्च ठेवायची आणि व्यवहार पूर्ण सचोटीने करायचा हे तत्व आयुष्यभर कामात पाळल्यामुळे ‘रानडे’ या बांधकाम व्यवसायिकाच्या नावाला एक वजन आणि विश्वास प्राप्त झाला” हे ही तितक्याच साधेपणाने लिहतात. सचोटी आणि प्रामाणिकपणा बाळगूनही उत्तम व्यवसाय करता येतो आणि असा व्यवसाय लोकमानसात खरी प्रतिष्ठाही देतो , हा संदेश या क्षेत्रातील व्यवसायिकानी रानडेसाहेबांच्या जीवनापासून घ्यावा. आर्थिक प्राप्तीला सात्विकतेचा स्पर्श नसेल तर त्यामुळे येणारी श्रीमंती केवळ धग देते, जीवनातील शीतलता नष्ट करते. कुठल्याही नोकरी, व्यवसायात अर्थार्जन करताना चेहर्‍यावर सदैव समाधानाचा भावही कमवावा लागतो तो केवळ सात्विकता आणि प्रामाणिकपणा जपण्याने येतो॰ मागच्या पिढीने बहूतांशाने जपलेला हा भाव आज सर्व क्षेत्रात अभावाने आढळतो हे समाजाचे दुर्दैव आहे. 

संस्थान काळातील अनेक भव्य आणि सुबक वास्तूंनी नटलेले फलटण शहर नवीन विकासाची वाट चालू लागले, व्यापार उदीम वाढू लागला त्या काळात रानडे साहेबा सारखा अभियंता लाभला हे फलटण शहराचे भाग्य म्हणावे लागेल. मुधोजी महाविद्यालय, एस. टी. स्टँड, फलटण आणि वडूज येथील स्टेट बँकच्या इमारती , फलटण पोलिस वसाहत , अहिल्याबाई मटण मार्केट, अधिकारी क्वार्टर, सुपर मार्केट, रेव्हेन्यू क्लब या फलटण शहरातील वास्तु बरोबरच सातारा सिव्हिल होस्पिटलचे काम रानडेसाहेबांच्या कारकीर्दीतील अत्यंत उल्लेखनीय काम म्हणावं लागेल ! या सर्व वास्तु सुबक , उपयुक्तता , आणि टिकाऊपणाची साक्ष देत आजही उभ्या आहेत. अशा वास्तु बरोबरच गावातील विविध नेत्यांचे पुतळे ही रानडे साहेबांच्या हाताने बसवले गेले. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, म. फुले, लोकमान्य टिळक, क्रांतीविर उमाजी नाईक आणि श्रीमंत राणी साहेबांचा पुतळा ही सर्व कामे रानडे साहेबांनी करून फलटण शहर सुशोभित केले तर प.पू. उपळेकर महाराजांना समधिस्त करण्याचे पुण्यकर्म ही त्यांच्या हातून घडले. शहरातील अनेक नागरिकांच्या घरांची छोटी मोठी कामे सुध्दा ते इतके मन लावून सचोटीने करायचे की सर्वांच्या तोंडी त्यांचे नाव आदराने भरून राहिले. ३० वर्षाच्या प्रदीर्घ काळात त्यांच्या हाताखाली अनेक कामगारांची आयुष्ये उभी राहिली त्या सर्व हमाल, छकडेवाले, टेम्पोवाले,मिस्त्री गवंडी यांचा देखील प्रेमपूर्वक आवर्जून उल्लेख त्यांच्या पुस्तकात त्यांनी केला आहे त्यावरून लहान सहान माणसाबद्दल त्यांची आस्था दिसून येते. बांधकाम क्षेत्रातील लोकांनी त्यांचा हा गुण आवर्जून घेण्यासारखा आहे. 

बांधकाम क्षेत्रात काम करत असताना यश मिळाले, आर्थिक प्राप्ती झाली तेंव्हा आपणही हे समाजाचे ऋण जमेल तसे फेडावे अशा साध्या, सात्विक विचाराने रानडेसाहेबांनी अनेक सामजिक संस्थाच्या कार्यात भाग घेतला. अनेक संस्थांना झाकल्या मुठीनी मदत केली. हे सर्व करताना व्यासपीठाचा फार मोटठा सोस केला नाही ज्या संस्थांना ते मदत करीत त्या संस्थाच्या कार्यक्रमात त्यांना मी अनेकवेळा साधेपणाने प्रेक्षकात बसलेले पहिले. व्यासपीठा वरील भ्रामक मोटठेपणा पेक्षा त्यांच्या सात्विक निस्वार्थीपणाने त्यांना जनमानसाच्या मनात आदराचे स्थान मिळाले. देवघरात तेवणार्‍या समई सारखे शांत,सोज्वळ, सात्विक आयुष्य जगून रानडेसाहेब काळाच्या पडद्याआड गेले, त्यासाठी त्यांनी दिवस निवडला तो ही ‘अभियंता दिन’ ! हा निव्वळ योगायोग नसून संत महात्मे जशी आपल्या समधीची तिथी ठरवतात तशी त्यांनी अभियंता दिनाचीच निवड केली असावी. रात्रभर देवघरात अखंड जळणारी समई सकाळी विझताना सर्वांच्या हातात एक सकाळ सोपवते तद्वत आजच्या व्यवसायिकतेच्या अंधकारात बुडत असलेल्या समाजासाठो रानडे साहेब आदर्श विचारांची सकाळ ठेवून गेले आहेत. रानडेसाहेबांच्या आदर्श कार्यप्रकाशाच्या वाटेवर या क्षेत्रातील लोकांनी आणि सर्वांनीच वाटचाल करण्याचा प्रयत्न करणे ही त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल !

- उस्मानभाई शेख.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya