बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर, १० नोव्हेंबरला निकाल


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२५: बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून निवडणूक आयोगाने शुक्रवारी तारखांची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी विधानसभेच्या २४३ जागांसाठी होणा-या या निवडणुकीसाठी तारखांची घोषणा केली. २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुस-या आणि ७ नोव्हेंबरला तिस-या टप्प्यातील मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ७१, दुस-या टप्प्यात ९४ आणि तिस-या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. म्हणजेच दिवाळीपूर्वीच बिहारमध्ये फटाके वाजणार आहेत. 

बिहार विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया २९ नोव्हेंबरपूर्वीच संपणार आहे. त्यामुळे, दिवाळीपूर्वीच बिहारमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होणार, हे स्पष्ट होणार आहे. दिवाळीपूर्वीच मतदार आणि उमेदवारांची दिवाळी साजरी होणार आहे. देशात १४ नोव्हेंबर रोजी दिवाळीला सुरूवात होत आहे. 

बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागा असून जदयू, भाजपामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविताना रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. ‘कोरोनाचे संकट असल्याने जगातील ७० देशांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. बिहारमधील ही निवडणूक कोरोना काळातील सर्वात मोठी निवडणूक आहे. कोरोना काळातील ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या दृष्टीने मतदान केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे, अशी माहिती सुनील अरोरा यांनी दिली 

पक्ष आणि उमेदवारांना व्हर्च्युअल निवडणूक प्रचार करावा लागणार आहे. कोरोनामुळे मोठ्या जाहीर सभा घेतल्या जाणार नाहीत. तसे उमेदवारीसाठी दोनपेक्षा जास्त वाहने कोणत्याही उमेदवारासह येऊ शकत नाहीत, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे. एकूण २४३ जागांसाठी निवडणूक होणार असून यामधील ३८ जागा अनुसूचित जाती आणि दोन जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असणार आहेत. निवडणुकीत १८ लाख ८७ हजार शेतकरी मतदान करु शकतील असे सुनील अरोरा यांनी यावेळी सांगितले. 

मतदानाला एक तासाचा अधिक कालावधी 

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे नवीन सुरक्षा नियमांनुसार निवडणुका घेण्यात येतील. मतदान केंद्रावर मतदारांची संख्या कमी असेल. एका बूथवर एक हजार मतदार असतील. तसेच यावेळी बिहार निवडणुकीत एक लाखांहून अधिक मतदान केंद्रे असतील. यावेळी मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे. बिहार निवडणुकीत मतदानासाठी आणखी एक तासाचा कालावधी ठेवण्यात आला आहे. म्हणजेच सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होईल. मात्र नक्षलग्रस्त भागात असं होणार नाही. तसेच शेवटच्या तासात कोरोनाचे रुग्ण मतदान करू शकतील. 

६ लाख पीपीई किट, ४६ लाखांहून अधिक मास्क आणि सॅनिटायझर्स 

कोरोनाच्या संकटात राज्य निवडणूक आयोगाला ६ लाख पीपीई किट देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त, निवडणुकीत ४६ लाखांहून अधिक मास्क आणि सॅनिटायझर्सचा वापर केला जाणार आहे. पक्ष आणि उमेदवारांना व्हर्च्युअल निवडणूक प्रचार करावा लागणार आहे. कोरोनामुळे मोठ्या जाहीर सभा घेतल्या जाणार नाहीत. तसे उमेदवारीसाठी दोनपेक्षा जास्त वाहने कोणत्याही उमेदवारासह येऊ शकत नाहीत’ अशी माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे. 

कोविड रुग्णही करणार मतदान 

कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करतच बिहारमधील विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली असून तीन टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे. मात्र, कोविड रुग्णांना या निवडणुकीत मतदान करता येईल का? त्यांनी कसे मतदान करायचे? यासह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कोविड रुग्णांसाठी मतदानाची वेळ निश्चित केली आहे. कोरोना रुग्णांसाठी मतदानाची स्वतंत्र व्यवस्था असून मतदान केंद्रावर शेटवच्या क्षणी ते मतदानाचा हक्क बजावतील. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन एका मतदान केंद्रावर एक हजार मतदारांनाच मतदान करता येणार आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya