भाजप सरकार बनवण्याच्या तयारीत नाही, महाविकास आघाडी सरकार स्वतःच्या कृतीनेच कोसळेल; राऊतांच्या भेटीवरून देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

 

स्थैर्य, मुंबई, दि.२७: शिवसेना खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्यानंतर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान या बैठकीवरून देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या भाजप सरकार बनवण्याच्या तयारी नसून माझ्या मुलाखतीसाठीच ही भेट झाल्याचे फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, माझी मुलाखत घेणार असल्याचे संजय राऊत यांनी घोषित केले होते. पण या मुलाखतीसाठी माझ्या काही अटी होत्या. मुलाखतीच्या अटींवर चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो. दरम्यान जे सरकारचे काम सुरू आहे. त्यावर जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल, ज्यावेळी हे सरकार पडेल त्यावेळी आम्ही बघू पण भाजपला सरकार बनवण्याची कोणतीही घाई नाही असेही फडणवीस म्हणाले.

‘सामना’साठी मुलाखत घेण्याबाबत चर्चा झाली - संजय राऊत

दरम्यान संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन या गुप्त भेटीबद्दल स्पष्टीकरण दिले होते. आम्ही वैयक्तिक शत्रू नाही, फडणवीसांसोबत गुप्त बैठक नव्हती, तर ‘सामना’साठी मुलाखत घेण्याबाबत चर्चा झाली, असे राऊत यांनी सांगितले.

''देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे त्यांना भेटणे हे काही गुप्तपणे नव्हते. ही काही बंकरमध्ये भेट नव्हती. त्यांच्याशी बऱ्याच दिवसांपासून भेटण्याचा विचार होता. त्यांची जाहीरपणे मुलाखत घेण्याचा विचार होता. मी संपादक म्हणून फडणवीसांची जाहीर मुलाखत करावी अशी महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यविषयक संस्थांचीही इच्छा आहे,'' असे राऊत म्हणाले.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya