सुशांत प्रकरणात सर्वात मोठी कारवाई:रिया चक्रवर्तीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केली अटक, ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्रीची आज सलग तिस-या दिवशी झाली होती चौकशी

 


स्थैर्य, मुंबई, दि.८: ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने रिया चक्रवर्तीला अटक केली आहे. थोड्याच वेळात तिची मेडिकल आणि कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर सादर करुन तिला रिमांड मागितला जाईल. 

एनसीबीकडून रियाच्या चौकशीचा आज तिसरा दिवस होता. यापूर्वी सोमवारी रिया सकाळी साडे नऊ वाजता बल्लार्ड इस्टेटस्थित एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली होती. आणि तेथून संध्याकाळी सहा वाजता बाहेर पडली. एनसीबीने रिया, तिचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि घरगडी दीपेश सावंत यांना समोरासमाेर बसवून चौकशी केली होती. जवळजवळ आठ तासांच्या चौकशी रियाने स्वतः ड्रग्जचे सेवन केल्याचे कबुल केले नव्हते. मात्र ड्रिंक आणि स्मोकिंग करत असल्याचे मान्य केले. रियाच्या म्हणण्यानुसार, तिने जे काही केले ते फक्त सुशांतसाठी केले.

सुशांतच्या बहिणीविरोधात दाखल केली तक्रार

सोमवारी रात्री सुशांत मृत्यू प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला. सीबीआयच्या गुन्ह्यातील आराेपी रिया चक्रवर्तीने सुशांतची बहीण प्रियांका, डॉक्टर आणि इतरांविरुद्ध फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे. रियाने मुंबई पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत प्रियांका सिंह, राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉ. तरुणकुमार व इतरांनी सुशांतला बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन दिल्याचा आणि त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. ही तक्रार सुशांत व त्याच्या बहिणीत 8 जूनच्या व्हॉट्सअॅप चॅटबाबत आहे. याच दिवशी रिया सुशांतचे घर सोडून गेली होती.

रियाने काय आरोप केले?

सोमवारी एनसीबी कार्यालय सोडल्यानंतर रियाने वांद्रे पोलिस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरुन सुशांतची बहीण व डॉक्टर तरुण कुमार यांच्यावर भारतीय दंड संहितेतील 420,464, 465, 466, 468, 474, 306 आणि 120 बी कलमानुसार एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रियाचा आरोप आहे की, प्रियांका सिंहने सुशांत सिंहसाठी औषधांची स्लिप बनवली होती. ती चुकीची आहे, बनावट स्लिप आहे. डॉक्टरांनी सुशांतची तपासणी न करता फक्त प्रियांकाच्या सांगण्यावरुन नैराश्याची औषधे लिहिली होती. ही फसवणूक आहे आणि एनडीपीएस अॅक्ट, टेली मेडिसिन प्रॅक्टिस गाइडलाइन्सचे उल्लंघन आहे.

दुसरीकडे, ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एनसीबीच्या चौकशीसाठी रिया सलग तिस-या दिवशी एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली आहे. यापूर्वी सोमवारी रियाची आठ तास चौकशी केली. एनसीबीने या प्रकरणात नऊ जणांना अटक केली आहे.

दरम्यान, कोरोनाचा धोका व कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता रिमांडसाठी कोणत्याही आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच सादर करावे, असे आदेश कोर्टाने दिले आहेत..

सुशांतच्या कौटुंबिक वकिलांनी यावर प्रतिक्रिया दिली

रियाच्या तक्रारीवर सुशांतच्या कुटूंबाचे वकिल विकास सिंह म्हणाले की, "मुंबई पोलिसांना या प्रकरणाशी कुठले तरी कारण काढून जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. जेणेकरुन हे प्रकरण ते त्यांच्या पद्धतीने हाताळतील आणि सुशांतच्या कुटूंबाचा न्याय मिळणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, कारण हा अवमान करण्याचा विषय आहे. मुंबई पोलिसांना तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही."

पोलिसांनी सांगितले- प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले

मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, रियाच्या तक्रारीवरून दाखल केलेली तक्रार सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डोळ्यासमोर ठेवून सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.

सुशांतची बहीण श्वेता म्हणाली- एफआयआर चुकीची आहे

श्वेता सिंग किर्तीने ट्विटरवर लिहिले की, "खोट्या एफआयआरने आमचे धैर्य खचणार नाही."
Previous Post Next Post