बिहार निवडणूक : देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती, भाजप नेते भूपेंद्र यादव यांच्याकडून अधिकृत घोषणा

 

स्थैर्य, मुंबई, दि.३०: बिहारच्या निवडणूक तारखांची घोषणा झाली. यानंतर राजकीय पक्षांनी निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. यातच, भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस तसेच बी.एल.संतोष यांच्यासोबत बिहारच्या प्रमुख भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. भूपेंद्र यादव यांनी फडणवीसांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.

संपूर्ण ताकदीने बिहार निवडणूक लढवू- फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांची अधिकृतरित्या बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण ताकतीने निवडणूक लढवण्याचे बोलून दाखवले. 'भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. या जबाबदारीला निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करेल. संपूर्ण ताकतीने निवडणूक लढवू आणि जिंकू', असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

दरम्यान, बैठक संपल्यानंतर जेष्ठ भाजप नेते भूपेंद्र यादव यांनी परत एकदा एनडीए बहुमताने सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला. बिहारची जनता एनडीएसोबत आहे. भाजप, जेडीयू आणि एलजेपी मिळून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. यावेळेस जीतनराम मांझी यांचा पक्ष देखील आमच्यासोबत आहे. त्यामुळे आमची ताकद निश्चित वाढली आहे. बिहार विधानसभा निवडणूक एनडीए नक्कीच बहुमताने जिंकेल. लवकरच युतीची घोषणा केली जाईल, असेही भूपेंद्र यादव यांनी सांगितले.


 

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya