राजभवनातील रक्तदान शिबिरात कोरोनामुक्त कर्मचाऱ्यांचे रक्तदान; राज्यपालांनी दिली कौतुकाची थाप

 

स्थैर्य, मुंबई, दि.8: काही आठवड्यांपूर्वी कोरोनातून मुक्त झालेल्या राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी राजभवन येथे झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान तसेच प्लाझ्मा दान करून कोविड योद्धा होण्याचा मान मिळवला.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिबिराचे उद्घाटन करताना रक्तदान करणाऱ्या राजभवनातील नव्या कोरोना योद्ध्यांना कौतुकाची थाप दिली.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी शिबिरामध्ये सर्वप्रथम रक्तदान केले

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, त्यातून अनेक गरजू व्यक्तींना जीवनदान मिळते. अधिकाधिक लोकांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान करावे. कोरोनाला न घाबरता योग्य खबरदारी घेऊन कार्य करीत राहिले पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

शिबिरामध्ये एकूण 140 कर्मचारी, अधिकारी, त्यांच्या कुटुंबियांनी तसेच वाळकेश्वर परिसरातील नागरिकांनी रक्तदान व प्लाझ्मा दान केले.

शिबिराचे आयोजन राजभवन तसेच सर ज.जी. समूह रुग्णालय यांनी केले होते. कार्यक्रमाला ज. जी. समूह रुग्णालयाच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ. कल्याणी कुलकर्णी, राजभवनातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद जठार तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
Previous Post Next Post