बोगस क्रीडा प्रावीण्य प्रमाणपत्र प्रकरण : बोगस पत्त्यावर पुन्हा पत्रव्यवहार करून चौकशी अपूर्ण ठेवण्याचा डाव; शासनाचे सहा विभाग अद्यापही अंधारात

 

स्थैर्य, दि.२७: लाखाे रुपयांच्या गैरव्यवहारातून बाेगस क्रीडा प्रावीण्य प्रमाणपत्रधारकांनी शासकीय नाेकऱ्या माेठ्या संख्येत लाटल्या आहेत. या प्रकरणाचा भंडाफाेड हाेऊनही १५० पेक्षा अधिक जण अद्याप शासकीय सेवेत आहेत. क्रीडा विभागाच्या दिरंगाईमुळेच या प्रमाणपत्रधारकांना दिलासा मिळत आहेत. टॅम्पाेलियनची बनावट प्रावीण्य प्रमाणपत्रे जाेडणाऱ्या या उमेदवारांनी पत्रव्यवहारासाठीचा खाेटा पत्ता दिला आहे. याच खाेट्या पत्त्यावर औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुलातील उपसंचालकांकडून पत्रव्यवहार केला. मात्र, ही पत्रे परत आली आहेत. अशा पत्रव्यवहारातून या प्रकरणाची चाैकशीच अपूर्ण ठेवण्याचा डाव आखला जात आहे. बाेगस प्रमाणपत्राच्या आधारे शासनाच्या सहा विभागांत हे उमेदवार कार्यरत आहेत. याची माहिती अद्याप क्रीडा विभागाने नगर परिषद, जिल्हा परिषद, प्रादेशिक वाहन, महसुल, कृषी या सारख्या विभागांना अंधारात ठेवले. या १२९ जणांच्या प्रमाणपत्रांची पुन:पडताळणीच औरंगाबाद उपसंचालकांकडून झालेली नाही. आपल्यावरची कारवाई थांबवण्यात यावी आणि हे प्रकरण येथे दडपण्यात यावे, यासाठी प्रमाणपत्रधारक मंत्र्यांना साकडे घालत आहेत.

शासकीय कार्यालये साेडून उपसंचालकांचा उमेदवारांच्या घरी पत्रव्यवहार

बाेगस प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाच्या सहा विभागांमध्ये अनेक जणांनी नाेकरी मिळवली आहे. यादरम्यान या सर्व बाेगस प्रमाणपत्रधारकांनी आपल्या घराचा बाेगस पत्ता प्रमाणपत्रावर दिला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुलातील उपसंचालक बाेगस पत्त्यावर पत्रव्यवहार करत आहेत. मात्र, सदर शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या संबंधित विभागाला त्यांनी कळवले नाही. त्यामुळे पत्ता खाेटा असल्याने ही पत्रे परत येणार आहेत.

त्या १२९ जणांकडे दुर्लक्ष

बाेगस प्रमाणपत्राच्या विभागातील २५८ पैकी १६९ जणांनी शासनाची नाेकरी मिळवली आहे. मात्र, यातील फक्त ३१ जणांच्या प्रमाणपत्रांची पुन:पडताळणी करण्यात आली. उर्वरित १२९ जणांच्या बाेगस प्रमाणपत्रांची अद्याप औरंगाबाद विभागाच्या विभागीय क्रीडा संकुलाकडून पुन:पडताळणी झालेली नाही. त्यामुळे हे सर्व १२९ जण अद्यापही त्या-त्या शासकीय कार्यालयांमध्ये नाेकरी करत आहेत. त्यांच्या या बाेगस प्रमाणपत्राची अद्याप माहिती क्रीडा विभागाच्या वतीने देण्यात आलेला नाही. त्यामुळे हे सर्व जण शासनाची अजूनही फसवणूक करत आहेत.

औरंगाबाद विभागात चाैकशीचा नुसताच बागुलबुवा

औरंगाबाद विभागामध्ये २५८ बाेगस प्रमाणपत्रधारक असल्याचे समाेर आले आहे. यातील १६९ जणांनी शासकीय नाेकरीही मिळवली. मात्र, यातील निम्म्यापेक्षा अधिक जणांचा पत्रव्यवहारासठीचा खरा पत्ता अद्यापही औरंगाबादच्या उपसंचालकांकडे नाही. त्यामुळेच खाेट्या आणि बाेगस पत्त्यावर हा पत्रव्यवहार करून चाैकशीचा बागुलबुवा केला जात आहे. यातून हे प्रकरण चाैकशी अपूर्णमुळेच गुंडाळले जाण्याचा डाव आखला जात असल्याची चर्चा आता बाहेर रंगत आहे.

औरंगाबादच्या तलाठी युवकाचा कारवाईच्या भीतीने राजीनामा

टॅम्पाेलियन खेळाचे बाेगस प्रावीण्य प्रमाणपत्र लावून औरंगाबादच्या एका युवकाने शासकीय नाेकरी मिळवली हाेती. ताे गत काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यामध्ये तलाठीपदी कार्यरत झाला हाेता. मात्र, नुकताच बाेगस क्रीडा प्रावीण्य प्रमाणपत्र प्रकरणाचा भंडाफाेड झाला. त्यामुळे अशा प्रकारचे बाेगस प्रमाणपत्रधारकांचे धाबे दणाणले. अशा प्रकारच्या प्रमाणपत्राच्या माध्यमातून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आपल्यावरही कडक कारवाई हाेऊ शकते, हीच बाब लक्षात घेऊन औरंगाबादच्या युवकाने तत्काळ राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. सावध भूमिका घेत त्याने या पदाचा राजीनामा दिला आणि आपल्यावर कारवाई करण्यात येऊ नये, अशी विनंती केली.

चाैकशी व सुनावणी केल्याची एक संधी देत आहाेत : माेराळे

बाेगस क्रीडा प्रावीण्य प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नाेकरी मिळवणाऱ्या उमेदवार खेळाडूंना आम्ही आता पुन्हा पत्रव्यवहार करत आहाेत. यातून या सर्वांना पुन्हा एकदा आपली बाजू मांडण्याची संधी देत आहाेत. त्याकरिता आम्ही पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला. याच पत्राच्या माध्यमातून आम्ही संबंधित प्रमाणपत्रधारकांना या सुनावणीबाबतची सूचना दिली आहे. त्यामुळे त्यांच्या उत्तरानंतरच आम्ही कारवाई करणार आहाेत. ऊर्मिला माेराळे, उपसंचालक, विभागीय क्रीडा संकुल, औरंगाबाद.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya