पाटण ग्रामीण रुग्णालयासमोर बोंब मारो आंदोलनस्थैर्य, पाटण, दि. 3 : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना पाटणचे ग्रामीण रुग्णालय कर्मचारीविना मोकळे झाले आहे. यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी सातारा, पालकमंत्री, सातारा, महाराष्ट्र शासन यांना निवेदनाद्वारे वेळोवेळी कळविले आहे. तरी देखील वरिष्ठ पातळीवरून कोणीही याची गंभीर दखल घेतली नाही. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे   पाटणच्या ग्रामीण रुग्णालयासमोर मराठा-बहुजन क्रांती मोर्चा, सामाजिक ऐक्य परिषदेच्या समन्वयक व कार्यकर्त्यांनी रुग्णालय बंद करत प्रशासनाच्या विरोधात रुग्णालयाबाहेर बोंब ठोकली.  प्रशासन विभागाचा.. धिक्कार असो.., राज्यकर्त्यांचा धिक्कार असो, अशा घोषणा बाहेर दिल्या.


यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, विश्‍वहिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंतराव जगताप, आर. पी. आय. चे पश्‍चिम महाराष्ट्र सरचिटणीस रविंद्र सोनावले, तालुकाध्यक्ष प्राणलाल माने, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, नितीन पिसाळ, चंद्रहार निकम, दिनकर माथणे, लक्ष्मण चव्हाण, विक्रम मोहिते, दीपक मांडवकर उपस्थित होते.


विक्रमबाबा पाटणकर म्हणाले, तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना पॉझिटिव्ह रुग्णांची अवस्था बिकट  आहे. याबरोबर इतर आजारांच्या रुग्णांची अवस्था देखील कोरोना रुग्णांपेक्षाही जास्तच बिकट होत चालली आहे. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने पाटणचे ग्रामीण रुग्णालयच व्हेंटिलेटरवर आहे, अशी अवस्था आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील रुग्णांवर कोणत्याच रुग्णालयात उपचार होताना दिसत नाही. नाइलाजास्तव येथील रुग्णांना कराड, सातारा येथील शासकीय व खाजगी रुग्णालयात हलविण्यात येत आहे. तिथे या रुग्णांची परवड व्हेंटिलेटरविना वार्‍यावरची वरात, अशी सुरू आहे. याचे गांभीर्य कोणालाही पडले नसून तालुक्यातील मंत्री नेहमीप्रमाणे अधिकार्‍यांच्या बैठकीत व्यस्त आहेत.


राजाभाऊ काळे म्हणाले, पाटणच्या ग्रामीण रुग्णालयालाच आता व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली आहे. मुख्य डॉक्टरासंह सरासरी 40 कर्मचारी वर्ग असणार्‍या या रुग्णालयात सध्या केवळ 14 कर्मचारी हजर आहेत. वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स,  नर्स व आरोग्य कर्मचारी यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. यामुळे हजर असणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांवर  मोठ्या प्रमाणात कामाचा ताण पडलेला दिसत असताना दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत. त्यात ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य कर्मचारी यांच्यासह रुग्णांची  अवस्था बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत पाटणचे ग्रामीण रुग्णालय रुग्णांसाठी असून अडचण झाली आहे. कोरोनाच्या प्रार्श्‍वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाने देखील पाटणच्या ग्रामीण रुग्णालयाकडे दुर्लक्ष केले आहे. वेळोवेळी जिल्हाधिकारी, पालकमंत्री व महाराष्ट्र शासन यांना निवेदनाद्वारे कळवून देखील कोणताही ठोस निर्णय न झाल्याने रुग्णालयासमोर रुग्णालय बंद आंदोलन करण्याची वेळ आली. तातडीने 4 दिवसांत रुग्णालयातील रिक्त जागा भरून रुग्णांना येथेच उपचार सुरू करण्यात यावेत. अन्यथा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णालय पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल.


यावेळी ग्रामीण रुग्णालयासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  पाटणचे तहसीलदार समीर यादव यांनी आंदोलन ठिकाणी भेट देऊन आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत निवेदन स्वीकारले.  यावेळी आंदोलकांनी तहसीलदार यांनी दिलेल्या अश्‍वासनावर विश्‍वास ठेवून आंदोलन मागे घेतले.


अर्थ व गृहराज्य मंत्री या तालुक्याचे सुपुत्र आहेत. मंत्री झाल्यापासून त्यांनी अधिकार्‍यांच्या बैठकींचा सपाटाच सुरू केला आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून तर या बैठका दुप्पट वाढल्या आहेत. मात्र बैठकांमधून तालुक्याच्या भल्याचे फलित काय निघाले हे त्यांचे त्यांनाच माहीत. ज्या तहसील कार्यालयात बैठका सुरू असतात त्या तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या 3 कोविड सेंटरची व ग्रामीण रुग्णालयाची त्यांच्याकडून अद्याप पहाणी झाली नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. तालुक्यातील रुग्णांच्या भल्यासाठी ग्रामीण रुग्णालयासमोर आंदोलन सुरू असताना मंत्री महोदय कोयना धरणाच्या जलपूजनासाठी गेले. तेथून ते पाटण येथील विश्रामगृहात अधिकार्‍यांच्या बैठकीत व्यस्त झाले. मात्र त्यांनी ग्रामीण रुग्णालयाकडे येण्याची तसदी घेतली नाही. हे आंदोलनकर्त्यांच्यात चर्चेचा विषय ठरला.

 


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya