छत्रपती शिवाजी महाराज कोरोना केअर सेंटर प्रेरणादायी उपक्रम : डॉ. सौ. अमिता गावडे पवार

 

स्थैर्य, फलटण: एका उदात्त हेतुने व मोठ्या कष्टाने मराठा क्रांती मोर्चा आणि महाराजा संस्था समुहाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज कोविड केअर सेंटर समाजातील गरीब व गरजू रुग्णांवरील उपचारासाठी कोठेही कमी पडणार नाही याची ग्वाही देत खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून उभारण्यात आलेल्या या सेंटरमध्ये कोविड रुग्णांवरील उपचारामध्ये, त्यांना पुरेशी वैद्यकीय सेवा देण्यामध्ये आपण व आपले सहकारी कोठेही कमी पडणार नाही याची ग्वाही गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे-पवार यांनी यावेळी दिली.

मराठा क्रांती मोर्चा फलटण आणि महाराजा संस्था समुह, फलटण यांच्या संयुक्त सहभागाने सद्गुरु शिक्षण संस्था संचलित 'आनंदवन' परिसरातील सहकार महर्षी स्व. हणमंतराव पवार हायस्कूल, फलटण येथे ऑक्सिजन सुविधेसह २० बेडचे सुसज्ज कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून त्याचे उदघाटन फित कापून गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे-पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाचे मार्गदर्शक सुभाषराव शिंदे यांचे हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे मार्गदर्शक व महाराजा आणि सद्गुरु संस्था समुहाचे संस्थापक, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, नगर परिषदेतील विरोधी पक्ष गटनेते अशोकराव जाधव, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

छ. शिवाजी महाराज कोविड केअर सेंटर मधील अद्ययावत ऑक्सिजन बेड व अन्य सुविधा अनेकांचे प्राण वाचविणार असल्याचे नमूद करीत, शहर व तालुक्यातील अन्य सेवाभावी, सहकारी संस्था, व्यक्ती यांनी अशा प्रकारची आणखी कोविड केअर सेंटर उभारण्याची गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन यावेळी मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले. आगामी १/२ महिन्यात शहर व तालुक्यात कोविड बाधीतांची संख्या झपाट्याने वाढणार असल्याचे नमूद करीत यानिमित्ताने उभी राहणारी आरोग्य यंत्रणा आपल्याच लोकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याने त्यासाठी सर्वांनी पुढे येऊन सढळ हाताने मदत करावी असे आवाहन मुख्याधिकारी काटकर यांनी केले.

केवळ फलटण नव्हे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना बाधीतांची संख्या झपाट्याने वाढत असून हॉस्पिटल किमान ऑक्सिजन युक्त बेड कमी पडत आहेत, पैसे असूनही बेड उपलब्ध होत नाहीत या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार मराठा क्रांती मोर्चा व महाराजा संस्था समुहाच्या माध्यमातून ऑक्सिजन युक्त २० बेड असलेले छ. शिवाजी महाराज कोविड केअर सेंटरची उभारणी करुन शासनाकडे सुपूर्द करीत आहोत, भविष्यात गरज भासल्यास आणखी २० बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देत मराठा क्रांती मोर्चाचे माध्यमातून उभारण्यात आलेले हे महाराष्ट्रातील पहिले कोरोना केअर सेंटर असून महाराजा संस्था समुह व आपण स्वतः या कामी नेहमीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे दिलीपसिंह भोसले यांनी आवर्जून सांगितले.

प्रख्यात भुलतज्ञ डॉ. सुनीता निंबाळकर यांनी कोरोना आजार होऊ नये याविषयी घ्यावयाची दक्षता, शक्यतो घराबाहेर पडू नका, आवश्यक असेल तर मास्क, सॅनिटायझर वापर, सुरक्षीत अंतर आदी बाबी कटाक्षाने सांभाळण्याचे आवाहन केले.


फलटण शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व त्यांच्यावर उपचार करणारी रुग्णालये यामध्ये खूप मोठी तफावत असल्याने बाधीत रुग्णांना वेळेवर उपचार, ऑक्सिजन सुविधा मिळण्यात अडचणी येत असल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत असताना बाधीतांची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या विचारात घेऊन इंसिडन्ट कमांडर तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार वगैरेंनी रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन उपचाराच्या सुविधा विशेषतः ऑक्सिजन युक्त बेडसह कोरोना केअर सेंटर उभारण्याचे आवाहन केल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा व महाराजा संस्था समुहाच्या माध्यमातून छ. शिवाजी महाराज कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली असून आज सदर सेंटर समारंभपूर्वक प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आले.

मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य मार्गदर्शक ज्ञानेश्वर उर्फ माऊली सावंत यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात समाजाच्या विविध मागण्यांसाठी तालुका पातळीवर फलटण येथे अभूतपूर्व मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठविणाऱ्या याच मराठा मोर्चाने आज कोरोनाच्या अत्यंत कठीण परिस्थितीत मराठा व इतर समाजातील गोरगरीब व गरजूंना वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कोविड केअर सेंटर उभारले असून हे सुसज्ज कोविड केअर सेंटर शासनाकडे सुपूर्द करीत आहोत, मराठा क्रांती मोर्चा यापुढेही समाजातील सर्व घटकांना योग्य ती मदत करण्यात कधीही कमी पडणार नाही याची खात्री ज्ञानेश्वर तथा माऊली सावंत यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रदीप चव्हाण सर यांनी आणि समारोप व आभार प्रदर्शन जयकुमार शिंदे यांनी केले. कार्यक्रमास तुषारभई गांधी, नितीन उर्फ भैय्या भोसले, अनुप शहा, संदीप जगताप, उमेश निंबाळकर, प्रवीण शिंदे, राजेंद्र रेपाळ, संतोष सावंत यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे मार्गदर्शक, समन्वयक, महाराजा व सद्गुरु संस्था समुहातील संचालक, अधिकारी कर्मचारी, सद्गुरु शिक्षण संस्था, ब्रिलियंट इंग्लिश मिडीयम स्कूल मधील शिक्षक आणि फलटण व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya