मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उभारणार ४० बेड्सचे "छत्रपती शिवाजी महाराज कोरोना केअर सेंटर"; दानशूरांना मदतीसाठी आवाहन


स्थैर्य, फलटण : सध्या फलटण शहरात व तालुक्यात कोरोनाने थैमान घातलेले आहे. बहुतांश रुग्णांना कोरोना केअर सेंटर मध्ये बेड्स मिळताना हाल होत आहेत. हेच जाणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने "छत्रपती शिवाजी महाराज कोरोना केअर सेंटर" उभारले जाणार आहे. त्या मध्ये ४० बेड्स हे ऑक्सिजनचे असणार आहेत तर इतर बेड्स हे नियमित असणार आहेत. या साठी समाजातील दानशूर मंडळींनी पुढे यावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने करण्यात आलेले आहे.


मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने फलटण येथील हॉटेल महाराजा व्हेज येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या वेळी प्रांताधिकीरी शिवाजीराव जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील यांच्यासह मराठा क्रांती मोर्च्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. 


"छत्रपती शिवाजी महाराज कोरोना केअर सेंटर" मध्ये येत्या २ ते ३ दिवसात तातडीने २० ऑक्सिजन युक्त बेड्स सुरु करणार आहे. तर आगामी काळात गरज लागेल अश्या विविध सुविधा वाढवण्यात येणार आहे. "छत्रपती शिवाजी महाराज कोरोना केअर सेंटर" मध्ये डॉक्टर्स व इतर वैद्यकीय सुविधा सुद्धा मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने पुरवण्यात येणार आहेत. 


"छत्रपती शिवाजी महाराज कोरोना केअर सेंटर" हे रुग्णालय कुठे करायचे ? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर माजी नगराध्यक्ष दिलीप भोसले यांनी त्यांच्या संस्थच्या शाळेमध्ये उभे करण्याबाबत मान्यता दिली. त्या सोबतच तिथे लागणारे स्वच्छता कर्मचारी, पिण्याच्या व वापरायच्या पाण्याची व्यवस्था हे सर्व सद्गुरू शिक्षण संस्था करेल असे आश्वासन हि त्यांनी या वेळी दिले. 


कोरोना केअर सेंटर उभारणी साठी लागणाऱ्या सामुग्री बाबत प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील यांनी माहिती दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्च्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ताबडतोब मदत अदा करून २० बेड्सचे काम करण्यासाठी लागणाऱ्या सामुग्रीची ऑर्डरसुद्धा देण्यात आली. या मुळे आगामी २ ते ३ दिवसात "छत्रपती शिवाजी महाराज कोरोना केअर सेंटर" उभे राहण्याचा मार्ग सुकर झाला. 


कोरोनाच्या वाढता प्रकोप लक्षात घेता प्रांताधिकीरी शिवाजीराव जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील यांनी फलटण येथे मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने "छत्रपती शिवाजी महाराज कोरोना केअर सेंटर" उभे करत असल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. व दानशूरांनी पुढे येऊन सढळ हाताने मदत करावी असे आवाहनही सर्वांनी केले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya