धनगर समाज आरक्षणासाठी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दि. १ ऑक्टोबर रोजी निवेदने देणार

 

स्थैर्य, फलटण दि. २९ : माळशिरस, जि. सोलापूर येथे धनगर आरक्षण कृती समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारीणी बैठक दि.२५ सप्टेंबर रोजी संपन्न झाली, या बैठकीत धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी तात्काळ होणे करिता दिशा ठरविणेसाठी सविस्तर चर्चा करण्यात आली असून या चर्चेनुसार आगामी काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणा बरोबरच धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य कार्यवाही तातडीने करणेबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला असल्याचे पै. बजरंग गावडे यांनी सांगितले. 

माळशिरस बैठकीतील निर्णयानुसार दि. १ आक्‍टोंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी खालीलप्रमाणे शांततेने निवेदन देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले असून त्याचबरोबर आगामी काळात राज्यातील प्रमुख नेते मंडळी प्रामुख्याने खा. शरद पवार, मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची कृती समितीच्या नेत्यांनी वेळ घेऊन धनगर प्रश्न सोडविण्यासाठी आग्रह धरण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले. 

या निवेदनामध्ये धनगर समाजाची आर्थिक, राजकीय, शैक्षणीक व सामाजिक परिस्थिती अत्यंत हलाखीची व बिकट झालेली असून यामधून धनगर समाजाची सर्वांगीण प्रगती होणेसाठी केंद्र व राज्य शासनाने योग्य समन्वयातून या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करीत महाराष्ट्र शासन आरक्षण यादीत धनगर समाजाचा आदिवासी मध्ये समावेश करण्यात आला आहे, तथापी त्यामध्ये धनगर ऐवजी धनगड असा उल्लेख झाल्यामुळे समाजाला आरक्षणाचे फायदे मिळू शकत नाहीत, सदर दुरुस्ती करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी १) महाराष्ट्र आदिवासी यादीमध्ये अनुक्रमांक ३६ वर धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती केंद्र शासनाने करावी याबाबतची शिफारस करण्यात यावी, २) केंद्र शासनाने या दुरुस्तीचे बिल तयार करुन संसदेमध्ये मंजूर करुन घ्यावे, किंवा संसदेत सादर झालेल्या ३२५ क्रमांकाच्या बीलामध्ये ही दुरुस्ती टाकून बिल मंजूर करावे, किंवा या दुरुस्ती बाबतचा राष्ट्रपती यांचे मान्यतेने अध्यादेश त्वरित काढण्यात यावा अशी मागणी तमाम धनगर समाजाच्या वतीने करण्यात येत असल्याचे दि. १ ऑक्टोबरच्या निवेदनात स्पष्ट करण्यात यावे, आणि सदर निवेदन जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी आपल्या शिफारशीसह कृपया, मुख्यमंत्री यांना सादर करावे, अशी विनंती त्यांना करण्यात यावी असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे पै. बजरंग गावडे, पै. बजरंग खटके यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समितीच्या माध्यमातून माळशिरस येथील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्याच माध्यमातून तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन वरीलप्रमाणे मागणीची निवेदने देण्यात येणार असल्याचे पै. बजरंग गावडे यांनी सांगितले.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya