आ. जयकुमार गोरे यांच्या मध्यस्थी नंतर भाजप नगरसेवक अनिल माळी यांचं आंदोलन स्थगित

 

स्थैर्य, वडूज, दि.२१: वडूज शहरात दिवसेंदिवस वाढतच चाललेली कोरोना बधितांची संख्या व अपुऱ्या पडणाऱ्या सुविधा या पार्श्वभूमीवर वडूज नगरपंचायत चे भाजप नगरसेवक अनिल माळी यांनी वडूज येथील तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन सुरू केले होते.खटाव तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडूज शहरात एक जम्बो कोविड सेंटर उभारण्यात यावे,या सेंटर मध्ये तज्ञ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नेमण्यात यावेत,ऑक्सिजन बेड,व्हेंटिलेटर बेड,औषधे,गोष्टी परिपूर्ण असाव्यात आदी मागण्या साठी अनिल माळी यांनी वडूज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं होतं.

आंदोलनास भाजप तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण, यांचेसह अनेक मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दिला.

माण खटाव चे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी या आंदोलनास ही भेट देवून अधिक माहिती घेतली व खटाव तहसीलदार अर्चना पाटील यांचे बरोबर चर्चा केली.या चर्चे वेळी आंदोलकांसह वडूज नगरपंचायत चे मुख्याधिकारी माधव खांडेकर व इतर नगरसेवक यांची उपस्थिती होती. सुमारे अर्धा तास चाललेल्या या चर्चेमध्ये वरील सर्व मागण्या मान्य होवून त्वरित अंमलबजावणी करण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिल्यामुळे आमदार गोरे यांच्या सांगण्यावरून माळी यांनी हे धरणे आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले.

अनिल माळी यांचे बरोबर भाजप जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव खाडे, शहर अध्यक्ष प्रदीप शेटे,उपनगराध्यक्ष प्रतिनिधी जयवंत पाटील,स्वीकृत नगरसेवक नीलेश गोडसे,डॉ प्रशांत गोडसे,पंतप्रधान जनकल्याण समिती चे अध्यक्ष प्रा अजय शेटे आदींची उपस्थिती होती.