रेल्वे वॅगन निर्मिती प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

स्थैर्य, अमरावती, दि.२१: जिल्ह्यातील बडनेरा क्षेत्रात निर्माण होत असलेला रेल्वे वॅगननिर्मिती प्रकल्प हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांनाही रोजगाराची संधी निर्माण होतील. या प्रकल्प निर्मितीमुळे संपूर्ण देशात जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होणार आहे. रेल्वे वॅगन निर्मिती प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी, राज्य शासनाकडून आवश्यक सहकार्य आपणास पुरविण्यात येईल, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली. 

येथील बडनेरा स्थित रेल्वे वॅगन प्रकल्पाला पालकमंत्र्यांनी भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रकल्पाचे अभियंता एस. सी. मोहोड यांच्यासह अन्य रेल्वे तांत्रिक अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते 

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, रेल्वे वॅगन निर्मिती प्रकल्पाच्या कामाला 2017 मध्ये सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीमुळे स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल, यासाठीही प्रयत्न व्हावा व प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी. प्रकल्पाच्या बाजूने काटआमला या गावाला रस्ता जातो. प्रकल्पामुळे हा रस्ता बंद न करता वळण रस्ता म्हणून कायम सुरु राहावा, यासाठी रेल्वे विभागाने सुरळीत नियोजन करावे. प्रकल्प निर्मितीमुळे जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

रेल्वे वॅगन प्रकल्प हा 300 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. वर्ष 2017 मध्ये प्रकल्पाच्या कामाला शुभारंभ झाला असून येत्या एका वर्षात प्रकल्पातील काही कामांचे टप्पे पूर्ण होणार आहेत. कोविड-19 च्या संकटामुळे कामांना काही प्रमाणात उशीर झाला आहे. परंतू, आता पूर्ण ताकदीने आम्ही प्रकल्पाची कामे पूर्णत्वास नेणार आहोत. देशात हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे, मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असणाऱ्या झाशी वॅगन रिपेरिंग केंद्रातच सर्व मध्य रेल्वेचे काम पूर्ण केले जात होते. परंतू, आता या प्रकल्पामुळे नागपूर, भुसावळ, मुंबईपर्यंतच्या सर्व रेल्वे गाड्यांची दुरुस्ती व इतर महत्वाची कामे पूर्ण होणार आहेत. 

या प्रकल्पाच्या माध्यमातून 180 वॅगन प्रत्येक महिन्याला दुरुस्ती होऊ शकणार आहे. संपूर्ण बॉडी रिपेरिंग, बोगी शॉप, व्हील रिपेरींग, पेंन्ट व इन्सपेक्‍शन शेड इत्यादी या प्रकल्पात महत्वाची केंद्र उभारण्यात येणार आहेत. एका रेल्वे गाडीचे दर साडे चार वर्षांनी वॅगन रिपेरींग करावी लागते. त्यानुसार सर्व आधुनिक यंत्र, मशीन आणि तज्ज्ञ अभियंता, तांत्रिक कर्मचारी, कारागीर यांच्या सहाय्याने रेल्वे वॅगनची दुरुस्ती व देखभाल आदी कामे पूर्ण केल्या जाते, अशी माहिती प्रकल्पाचे अभियंता एस. व्ही मोहोड यांनी पालकमंत्र्यांना यावेळी दिली. यावेळी प्रकल्पाच्या परिसरात पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.