वडूज व परिसरातील गावात कोरोनाचा वेग झपाट्याने,बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

 


स्थैर्य, सातारा, दि. ११ : गेल्या 8 दिवसात वडूज व परिसरातील गावात कोरोनाचा वेग झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. वडूज शहरातील कोरोना बाधितांची संख्या शंभरी पार करून गेली आहे. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी व वाढत चाललेली साखळी तोडण्यासाठी सर्वानुमते ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे वडूज शहरातील व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने गुरुवार, दि. 10 ते शनिवार, दि.  19 पर्यंत बाजारपेठ बंद ठेवून जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.


मेडिकल व दवाखाने सुरू राहणार आहेत. मायणी मेडिकल कॉलेज, पुसेगाव आरोग्य केंद्रात आतापर्यंत अनेकांच्या टेस्ट घेण्यात आल्या आहेत तर येथील तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये वडूजमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. काही जणांना घरीच क्वारंन्टाईंन करण्यात आले आहे. बरेच रुग्ण बरे होऊन गेले आहेत. विविध व्यवसाय करणारे व त्यांच्या संपर्कात आलेल्या काही जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. बरेच दुकानदार शासनाने कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांचे पालन न करता केवळ व्यवसाय वाढवण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत, अशा दुकानदारांवर पोलीस व नगरपंचायतीने कडक कारवाई करण्याची गरज आहे. त्यांच्यामुळेच कोरोना बधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे बोलले जात आहे.

 

कोरोना बाधित्यांची साखळी सातत्याने वाढू लागली आहे. गेल्या 2-4 दिवसात कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. शहरात बर्‍याच ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहेत तर वडूजसह इतर शेजारील गावात रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र गावोगावचे व्यापारी, नागरिक यांनी सध्या एकजुटीने पुढाकार घेऊन ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. अन्यथा येत्या काही दिवसात शहरातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. आसपासच्या भागातील मोठी गावे व बाजारपेठा अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण बंद झाल्याने परिसरातील, इतर तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने वडूज शहरात खरेदी करण्यासाठी गर्दी  करण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे वडूजकरांच्या हितासाठी काही दिवस बाजारपेठ बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी बरेच नागरिक व व्यापारीच करत आहेत. परिणामी वडूज व परिसरातील गावातही कोरोनाचा प्रसार जोर धरू लागल्याने प्रशासनाने हात टेकले आहेत.

शहरातील दुकानात व अन्य इतर ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या नियमांची पायमल्ली होत आहे. प्रतिबंधित क्षेत्र केलेल्या भागातील नागरिक खुले आम फिरत आहेत. त्यामुळे वडूज शहरात ठोस उपाययोजना न झाल्यास कोरोनाची परिस्थिती भयानक होईल, अशा सुप्त भीतीमुळे व्यापार्‍यांच्या या निर्णयाला वडूजमधील छोट्या- मोठ्या व्यावसायिकांनी  दुजारो देत व्यवसाय बंद ठेवले.  Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya