जमिनीत अनाधिकाराने प्रवेश केल्याबद्दल पाचजणांविरोधात गुन्हा

 

स्थैर्य, सातारा, दि.२०: न्यायालयाच्या आदेशाने जमीन वहिवाटत असतानाही अनाधिकाराने जमिनीत प्रवेश करून वहिवटण्यास मज्जाव करून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी भाटमरळी (ता. सातारा) येथील पाचजणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार गोविंद अवघडे, मयूर नंदकुमार अवघडे, पिंटू गोपाळ अवघडे, केशव मोहन अडागळे व तुषार आप्पा माने (सर्व रा. भाटमरळी, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत बोरगाव पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश शंकर गायकवाड (रा. भाटमरळी, हल्ली रा.फुलेवाडी, कोल्हापूर) यांची भाटमरळी येथे वडिलोपार्जित जमीन आहे. ते कोल्हापूर येथून येऊन-जाऊन जमिन कसत आहेत. ही जमीन देवस्थान असून या जमिनिशेजारील नंदकुमार अवघडे यांच्याशी वाद होता. हा वाद कोर्टातही गेला होता. कोर्टाने विरोधकांना कोणताही अडथळा करू नये, अशी ताकीद दिली होती. कोर्टात या वादाचा निकाल प्रकाश गायकवाड यांच्या बाजूने झाला होता. न्यायालयाच्या आदेशाने ते ही जमीन वहिवटत होते. काही दिवसांपूर्वी विरोधक नंदकुमार अवघडे, मयूर अवघडे, पिंटू अवघडे, केशव अडागळे व तुषार माने यांनी कोरोना साथरोगामुळे प्रकाश गायकवाड भाटमरळी येथे येऊ शकत नसल्याचा फायदा घेत गायकवाड यांचा मेहनतदार महेश जाधव यांना दमदाटी देत अडथळा केला व बळजबरीने जमिनीची नांगरट करून पेरणी केली.व न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya