ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे मुंबईत निधनस्थैर्य, मुंबई, दि. २४ : ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू आणि लोकप्रिय समालोचक डीन जोन्स यांचं मुंबईत आकस्मिक निधन झालं. ते 59 वर्षांचे होते. कार्डिअक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाला. इंडियन प्रीमिअर लीगचं प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स कंपनीसाठी समालोचक असणारे जोन्स याच कामानिमित्ताने शहरात आले होते. मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये ते वास्तव्याला होते.


गुरुवारी सकाळी साधारण अकराच्या सुमारास, जोन्स यांना कार्डिअक अरेस्ट झालं. त्यांनी सकाळी ब्रेकफास्ट घेतला. समालोचनाचं वेळापत्रक कसं असणार आहे हे जाणून घेतलं.


त्यानंतर आपल्या समालोचन सहकाऱ्यांसमवेत ते बॅट-बॉल खेळत असतानाच त्यांना त्रास जाणवू लागला. ते अचानक कोसळले. त्यांना तातडीने हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हॉस्पिटल प्रशासनाने मृत असल्याचं घोषित केलं.


या कठीण काळात त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू. पुढच्या प्रक्रियेसाठी आम्ही ऑस्ट्रेलियाच्या दूतावासाच्या संपर्कात आहोत असं स्टार इंडियाने आपल्या पत्रकात म्हटलं आहे.


जोन्स खेळाचे खऱ्या अर्थाने सदिच्छादूत होते. नवीन युवा खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देणं, मार्गदर्शन करणं याकरता ते नेहमी प्रयत्नशील असत. त्यांच्या बहारदार समालोचनाने खेळाचं वर्णन करत. जगभरातील लाखो चाहत्यांना त्यांनी नेहमी आनंद दिला. स्टार स्पोर्ट्सला आणि जगभरातील असंख्य चाहत्यांना त्यांच्या नसण्याने उणीव भासेल असंही पत्रकात म्हटलं आहे.


52 टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करताना जोन्स यांनी 46.55च्या सरासरीने 3631 रन्स केल्या. यामध्ये अकरा शतकं आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. 1986-87 मध्ये मद्रासच्या टाय टेस्टमध्ये त्यांनी झळकावलेलं द्विशतक आजही असंख्य क्रिकेटरसिकांच्या स्मरणात आहे.


जोन्स यांनी 164 वनडेत ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करताना 44.61च्या सरासरीने 6068 रन्स केल्या. यामध्ये 7 शतकं आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे.


1987 वर्ल्ड कपविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा जोन्स भाग होते. 1989 मध्ये अॅशेस विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा ते भाग होते.


पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेड संघांचं प्रशिक्षकपद त्यांनी भूषवलं होतं. अफगाणिस्तान संघांच्या प्रशिक्षकपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती.


प्रोफेसर डिनो या नावाने मॅचपूर्वीचं त्यांचं विश्लेषण प्रसिद्ध होतं. 2006 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील टेस्ट मॅचवेळी जोन्स समालोचक म्हणून काम करत होते. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू हशीम अमलाचा त्यांनी टेररिस्ट असा उल्लेख केला. दोन ओव्हर्सदरम्यानच्या ब्रेकमध्ये त्यांनी असा उल्लेख केला. आक्षेपार्ह उद्गारांमुळे टेन स्पोर्ट्सने त्यांची समालोचन कक्षातून हकालपट्टी केली. जोन्स यांनी अमलाची माफी मागितली.


"या बातमीवर विश्वास ठेवणं कठीण आहे. खूपच वाईट बातमी. डीन जोन्स, तुमच्या आत्म्याला शांती लाभो", असं ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज बॅट्सन डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे.


"धक्कादायक बातमी. यावर्षीची आणखी एक वाईट बातमी. खूपच भयंकर. गेल्या आठवड्यात त्यांच्याशी बोललो होतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे", असं टीम इंडियाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी म्हटलं आहे.


"डीन जोन्स यांचं आकस्मिक निधन ही बातमी धक्कादायक आहे. अजूनही विश्वास बसत नाही. माझ्या आवडत्या समालोचकांपैकी एक होते. माझ्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या क्षणांवेळी ते समालोचन करत होते. तुमची उणीव भासेल", असं टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन वीरेंद्र सेहवागने म्हटलं आहे.


"मित्र डीन जोन्सच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. खूपच लहान वयात त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत", असं टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.


"प्रचंड धक्कादायक बातमी. मी त्यांच्याबरोबर कॉमेंटेटर म्हणून काम करत होतो. सकाळी त्यांची प्रकृती व्यवस्थित होती. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाशी माझं व्हीडिओ कॉलवर बोलणं झालं. सगळं काही सुरळीत होतं. त्यांचं जाणं चटका लावणारं आहे", अशा शब्दात फास्ट बॉलर आणि समालोचक इरफान पठाणने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


"या क्षणी बोलायला माझ्याकडे शब्दच नाहीत. मी त्यांचा चाहता होतो. त्यांच्याबरोबर क्रिकेटवर बोलायला मजा येत असे. त्यांना मनापासून क्रिकेटची आवड होती. 59 हे जाण्याचं वय नव्हे. खूपच लवकर निरोप घेतलास मित्रा. क्रिकेटचं जग तुमच्याविना पोरकं असेल", असं समालोचक आकाश चोप्राने म्हटलं आहे.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya